सांगोला तालुका

सांगोल्यात ८ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन; संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (तालुका प्रतिनिधी): महाराष्ट्रातील समाजमन घडविण्यात मराठी साहित्य व साहित्य संमेलनाचे अनन्यसाधारण योगदान ध्यानात घेवून साहित्यिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मराठी भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी चालवलेला यज्ञ आणखी जोमाने तेवत ठेवण्यासाठी आणखी बळ मिळावे यासाठी सांगोल्यात राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनचे ८ एप्रिल ते १० एप्रिल या दरम्यान आयोजित केले असल्याची माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

सद्गुरु गजानन महाराज एज्युकेशन सोसायटी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या सहाय्याने सांगोल्यात राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना.सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार शहाजीबापू पाटील असणार आहेत. या कार्यक्रमास आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच सांगता समारोप कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अभिनेते किशोर कदम उपस्थित राहणार आहेत.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी बाबुराव गायकवाड, उपाध्यक्षपदी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, कार्याध्यक्ष प्रा.पी.सी. झपके, उपकार्याध्यक्ष भाऊसाहेब रुपनर, सचिव दादासाहेब रोंगे, सहसचिव उदयबापू घोंगडे, खजिनदार माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ तर समन्वयक म्हणून गटविकास अधिकारी आनंद लोकरे काम पाहणार आहेत. या साहित्य संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, निमंत्रितांचे राज्यस्तरीय कवी संमेलन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, लोककला, भारूड, ओव्या, शेतकरी परिसंवाद, चित्रकला प्रदर्शन, कलाप्रदर्शन यासह इतर कार्यक्रमांचे भरगच्च नियोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, डॉ. कृष्णा इंगोले यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. या साहित्य संमेलनात प्रसिद्ध साहित्यिक द.ता. भोसले, डॉ.कृष्णा इंगोले, भास्कर चंदनशिव, योगीराज वाघमारे यांच्यासह सांगोला तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ विधीज्ञ उदयबापू घोंगडे,  गटविकास अधिकारी आनंद लोकरे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, दादासाहेब रोंगे, गजानन भाकरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!