सांगोला तालुका

काका- काकींच्या विचाराने माणुसकीचे नाते जपणाऱ्या कार्यक्रमातून अनेकांना नवं जग पाहण्याची संधी मिळणार हेच त्यांच्या चरणी अभिवादन असेल : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

 

कार्यतपस्वी आम. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन संपन्न

 

दृष्टी मिळेल या अपेक्षेने आलेल्या वयोवृद्ध नागरिकांचा हसरा चेहरा मला सामाजिक काम करण्यासाठी निश्चितपणे ऊर्जा देत राहील, त्यांच्याकडून जे आशीर्वाद मिळतात त्यांची किंमत पैशांत करता येणार नाही. हे आशीर्वाद विज्ञानाच्या पलिकडे जाऊन काम करतात, आज काकांच्या आणि काकींच्या विचाराने माणुसकीचे नाते जपणाऱ्या कार्यक्रमातून अनेकांना नवं जग पाहण्याची संधी मिळणार आहे. हेच त्यांच्या चरणी अभिवादन असेल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली.

कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त सांगोला तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ मांजरी तालुका सांगोला येथे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते काल मंगळवार दिनांक 28 रोजी संपन्न झाला. यावेळी पुण्यस्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. या नेत्ररोग शिबिरास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. वयोवृद्ध नागरिकांसह चिमुकल्या मुलांनी देखील या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या डोळ्याच्या आजारावर तपासणी केली. यामध्ये एकूण 127 रुग्णांची तपासणी करण्यात आली. पैकी 40 रुग्णांना मोतीबिंदू आजार आढळून आला आहे. या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर उर्वरित नागरिकांच्या डोळ्याच्या आजारावरती औषधोपचार करून त्यांनाही योग्य मार्गदर्शन दिले आहे. या शिबिरासाठी युवा नेते डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, शिरभावी गावचे माजी सरपंच अभिजीत नलवडे, माजी उपसभापती नारायणराव जगताप, डॉ. वैभव जांगळे, डॉ. किरण जगताप, मांजरी ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगल मधुकर भुसे, उपसरपंच कौशल्या कांबळे, संगेवाडी गावचे सरपंच दामोदर वाघमारे, चेअरमन दीपक शिंदे, वाढेगाव चे माजी सरपंच नंदकुमार दिघे , मा. उपसरपंच अनिल दिघे, मा. सरपंच सचिन शिनगारे, अशोक शिनगारे, अमृतदादा उबाळे, भाऊसाहेब जगताप, दादासो शिनगारे, रंगनाथ पाटोळे, चारुदत्त शिनगारे, दत्तात्रय घाडगे, दिपक शिनगारे, पोपट दादा शिनगारे, उत्तम पवार, सज्जन जगताप, दामोदर शिनगारे, विष्णू साळुंखे, अनिल शिनगारे, गोरख फाटे, विजय फाटे, टिप्पू खाटीक यांच्यासह सारिका घाडगे, सुजाता भुसे तसेच मांजरी- देवकतेवाडी -पवारवाडी- जाधव वस्ती परिसरातील नागरिक- महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे -पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या विविध विकास कामांना चालना देण्याचा प्रयत्न केला होता. दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसण्यासाठी त्यांनी केलेले कार्य व त्यांचे योगदान आजही मोलाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गोरगरीब कुटुंबाला कायम त्यांनी मदतीचा हात दिला आहे. कष्टकरी गोरगरीब जनता, शेतकरी सुखी झाला पाहिजे ही त्यांची भूमिका आज ही मोठी शिकवण देऊन जाते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म जपण्याची त्यांची शिकवण आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आणी काकींच्या विचारांचा वारसा जोपासत नेत्ररोग शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात वृद्धांची दृष्टी कमी झाली की त्यांना घरात मान राहात नाही. दृष्टी मिळाली तरी त्यांच्यासाठी तो स्वर्ग असतो. म्हणूनच स्वर्गीय काका आणि काकींच्या विचाराने पुण्यस्मृति दिनानिमित्त गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना दृष्टी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. या शिबिरातून निश्चितपणे अनेकांना नव जग बघायला मिळेल, एवढेच नव्हे तर इतरही सामाजिक बांधिलकी जपून समाजासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. यासह प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखून समाजकार्यात योगदान दिले पाहिजे. असे सांगत कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत, मिरज येथील नेत्र रुग्णालय हॉस्पिटलचे देखील त्यांनी आभार मानले.
सदर नेत्ररोग शिबिर यशस्वी राबवण्यासाठी मांजरी ग्रामपंचायत मांजरी, व समस्त ग्रामस्थ मांजरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे- पाटील यांच्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त मांजरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अस्तित्व संस्था सांगोला यांच्या वतीने गावातील  डोळ्यांच्या दूरदृष्टीचा आजार असणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट कॉलिटी चे 50 चश्मे देण्यात आले आहेत. डोळ्यांच्या आजारावरील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सदरचे चष्मे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तसेच अस्तित्व संस्था सांगोला यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!