पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-29-at-12.59.03-PM.jpeg)
भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.
महिन्याभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सुरुवातीला प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. त्यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते.
गिरीश बापट आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच इतर नेत्यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.