सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न; तालुक्यात सामाजिक सलोखा अबाधित राहील याची मला खात्री- पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे

सांगोल्यातील नागरिक धार्मिक सलोखा चांगल्या प्रकारे पाळतात हे एकूण चांगले वाटले. त्यामुळे शांततेत सर्व उत्सव पार पडतील अशी मला खात्री आहे. ज्येष्ठ नागरिकांनी परस्परांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. सामाजिक, धार्मिक वातावरणासह सलोख्याचे संबंध चांगले आहेत ही ज्येष्ठांकडून मिळालेली एकप्रकारची देणगी आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात सामाजिक सलोखा अबाधित राहील याची मला खात्री असल्याचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बसवेश्वर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस स्टेशनच्यावतीने शांतता कमिटीची बैठक काल शुक्रवार दि.12 एप्रिल रोजी बचतभवन हॉल,पंचायत समिती सांगोला येथे आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे बोलत होते.
व्यासपीठावर खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कमरुद्दीन खतीब, हाजी शब्बीरभाई खतीब, सुरज बनसोडे, अतुल पवार, जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लटकत्या तारा, खड्डे यांचा संबंधीत प्रशासनाने बंदोबस्त करावा, मिरवणुकीवेळी पोलीसांनी योग्य प्रकारे काळजी घ्यावी, सांगोला पोलीसांनी जयंती मंडळाच्या परवानगीच्या अडचणी दूर कराव्यात असे सांगत पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे पुढे म्हणाले, सध्या मोबाईलसह सोशल मिडीयाचा वापर धार्मिक ताणतणाव निर्माण करण्यासाठी अतिप्रमाणात सुरु आहे.समाजाची शांतता धोक्यात आणणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगत एक दिवस व्यसनमुक्ती हा उपक्रम चांगला असून कायमच व्यसनमुक्त हा उपक्रम राबवावा असे आवाहन केले. जयंती उत्सवाप्रसंगी अनुचित प्रकार होणार नाही त्यासाठी पोलीसांनी प्रतिबंध ठेवावा असे सांगत सांगोल्यात काही होणार नाही हा विश्वास सांगोल्यातून घेऊन जातोय असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागासह शहरी भागात मोबाईलव्दारे आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे आपली माहिती व ओटीपी कोणालाही सांगू नये असे सांगत याबाबत सर्वानी जागृत राहणे गरजेचे आहे. येणार्या काळात मोबाईलवरुन आर्थिक फसवणूकीबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून याबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शांतता कमिटीचे सदस्य बाबुराव गायकवाड म्हणाले, सांगोल्यात पूर्वीपासूनच सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सांगोल्यासारखी जातीय एकात्मता संपूर्ण राज्यात पाहण्यास मिळणार नाही. सर्व सण, महापुरुषांच्या जयंत्या सांगोल्यातील सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन साजरा करतात त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्रीही त्यांनी दिली.
यावेळी सुरज बनसोडे, शब्बीर खतीब, प्रभाकर कसबे, बाबासाहेब बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, मनोज उकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परवानगी, रस्ते दुरस्ती, लाईटसह जयंती मिरवणूकीप्रसंगी पोलीस बंदोबस्त याविषयी अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी प्रभाकर कसबे
सदरच्या शांतता कमिटी बैठकीप्रसंगी े शांतता कमिटीचे सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सूत्रसंचालन स.पो.नि.नागेश यमगर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंती, विविध सण अत्यंत शांततेत सण साजरे करतात हे सांगोला तालुक्याचे वैभव आहे. कायदा सुव्यवस्थेचे पालन करणार्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतोय याचा मला अभिमान आहे.
आ.शहाजीबापू पाटील