सांगोला तालुका

उद्योजक जगन्नाथ भगत गुरुजी यांचा शिक्षक सेवानिवृत्ती निमित्त अभूतपूर्व शाही सत्कार सोहळा संपन्न

सांगोला( प्रतिनिधी )- संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये प्रसिद्धीस आलेल्या सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक व सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे चेअरमन उद्योजक  जगन्नाथ प्रल्हाद भगत गुरुजी यांच्या शिक्षक सेवानिवृत्तीचा  शाही सत्कार सोहळा मेडशिंगी येथे अभूतपूर्व पद्धतीने संपन्न झाला.
आपली माणदेशी रांगडी मायबोली वैशिष्ट्यपूर्ण डायलॉग मुळे जगप्रसिद्ध करणारे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार शब्दप्रभू शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक भाऊसाहेब रुपनर व सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक आणि एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले , सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक डॉ. बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंचावर सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष पी सी झपके सर,  पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी , दादासाहेब शेंडे पतसंस्थेचे चेअरमन अरुणभाऊ शेंडे, सरपंच उमा प्रतापसिंह इंगवले,  कल्पनाताई शिंगाडे, विका सोसायटीचे चेअरमन रामलिंग झाडबुके, तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कसबे, उपसरपंच उद्योजक अमर गोडसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील,  जिल्हा शिक्षक सोसायटीचे माजी शाखाध्यक्ष सिद्धेश्वर झाडबुके, साहेबराव शिंदे, राज्यस्तरीय शिक्षक नेते किरण कुंभार, संजय चेळेकर, सुरेश पवार, रमेश शिंदे,  सुहास कुलकर्णी, हरिदास घोडके , केशवराव घोडके, मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे ऋतुराज विले, श्रीरंगआप्पा बाबर, उद्योजक बाळकृष्ण भगत, उद्योजक सुरेश भगत , सपकाळ साहेब यांच्यासह विविध गावचे सरपंच नेते मंडळी उपस्थित होते. 
  शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये काम करत असताना विविध क्षेत्रांमधील सुमारे वीसहून अधिक पुरस्कार प्राप्त असलेले आदर्श शिक्षक जगन्नाथ भगत गुरुजी यांची 27 वर्षे शिक्षण सेवेतील पूर्ण झाली असून आणखी जवळपास बारा वर्षे नोकरी बाकी आहे. विविध प्रकारच्या चळवळीचा पिंड असलेले, अनेक प्रकारच्या कलागुणांनी युक्त असलेले, कष्ट, सचोटी, वक्तशीरपणा यामुळे उद्योग विश्वामध्ये यशस्वीतेकडे वाटचाल करणारे भगत गुरुजी यांनी पवित्र अशा शिक्षकी पेशाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून योग्य वेळी व अत्यंत समाधानाने हा सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला.  केवळ शिक्षकच नव्हे तर प्रशासनातील एखाद्या मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्याचा देखील एवढा मोठा सेवानिवृत्ती समारंभ फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर कदाचित महाराष्ट्रात देखील झाला नसेल इतका देखना व नयनरम्य सोहळा आज येथे संपन्न झाला.  करील मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी तयाचे. अशी अत्यंत सेवाभावी व समाधानाची प्राथमिक शिक्षकाची नोकरी दहा-बारा वर्ष शिल्लक ठेवून स्वेच्छानिवृत्तीचा घेतलेला निर्णय अतिशय धाडसी व कौतुकास्पद असल्याच्या भावना यावेळी अनेक मान्यवरांनी बोलून दाखवल्या.  सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलभाऊ इंगवले यांनी केले. मंचावरील मान्यवरांच्या शुभेच्छा नंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्रा. गणेश शिंदे यांनी शिक्षण ,संस्कार, उद्योग, दातृत्व आणि कर्तुत्व अशा विविधांगी विषयांवरती मार्मिक दाखले देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी शिक्षण, राजकारण ,समाजकारण ,उद्योग व व्यवसाय, शेतकरी , पशुपालक अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांपासून सर्वसामान्यांपर्यंत हजारो नागरिकांचा अलोट जनसमुदाय लोटला होता.
 आकर्षक पद्धतीने सजवलेल्या हत्तीवरील अंबारी मधून सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ भगत यांची शाही मिरवणूक. हत्ती , सजवलेले उंट , आकर्षक सजवलेले व तालावर नृत्य करणारे घोडे, शिंग, पताके ,मावळे असे महाराजा पथक. 
 सत्कारमूर्ती शिक्षकांना स्वतःला संगीत व वाद्य कलेची आवड असल्यामुळे — या शाही मिरवणुकीच्या ताफ्यामध्ये कोळेगाव येथील सुर सनई पथक,  सोलापूर येथील ढोल ताशा पथक, कराड जिल्हा सातारा येथील दरबार बँड पथक, मळोली माळशिरस येथील हलगी पथक, अकलूज येथील शिंगवाले पथक, अकलूज येथील महाराजा पथक, मेडशिंगी येथील भजनी मंडळ,  मासाळवाडी आटपाडी येथील लाइटिंग गजी ढोल मंडळ, सांगोला येथील सुंद्री वादन पथक, थ्री साऊंड डीजे सिस्टीम वाढेगाव, भीम ज्योत प्रबोधन मंच मेडशिंगी तसेच सुप्रसिद्ध अभिनेता चार्ली चापलीन यांच्या वेश्यामध्ये उपस्थित असलेला झी मराठी फेम हास्य दर्पण कलाकार अशा आगळ्यावेगळ्या सुमारे 12 वाद्यवृंदांसह शेकडो कलाकारांचा ताफा मिरवणुकीत सहभागी होता.   
 सत्कारमूर्ती शिक्षक जगन्नाथ भगत यांना लेखन कलेची तसेच कवितांची खूप आवड असल्यामुळे तसेच त्यांनी मेडशिंगी , हातीद व लवंगी तालुका मंगळवेढा या ठिकाणी वीस वर्षांपूर्वीपासून ग्रंथालय उभी केलेली आहेत. तसेच साहित्य संस्कृती, वाचन चळवळ व ग्रंथालय चळवळ यामध्येही त्यांचा वावर सतत राहिला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ग्रंथालय संघाकडून ग्रंथतुला करण्यात आली.     
 स्नेहभोजनानंतर रात्री    “माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत”     “गाथा महाराष्ट्राची ”     अत्यंत प्रेक्षणीय, श्रवणीय व डोळ्याचे पारणे फेडणारा असा कार्यक्रम संपन्न झाला.   कार्यक्रम स्थळी भव्य स्टेज, ग्रंथतुले करिता स्वतंत्र मंच, हत्ती, उंट, घोडे यांची देखील स्टेज परिसरामध्ये उपस्थिती अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई व सभा मंडप, भोजनाची तीन प्रकारची स्वतंत्र व्यवस्था व फटाक्यांची आतषबाजी . प्राथमिक केंद्रशाळेजवळ ग्रामस्थांच्या वतीने सरपंच उमाताई इंगवले यांच्या हस्ते  श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ. शाही सत्कार सोहळ्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक कमानी, संपूर्ण मिरवणूक मार्गांवरती पायघड्या रांगोळी व कार्यक्रम स्थळी संस्कार भारती रांगोळी.    सूर्योदय उद्योग समूह, एलकेपी मल्टीस्टेट परिवार, सूर्योदय सांस्कृतिक परिवार आणि समस्त मेडशिंगी ग्रामस्थ यांच्या वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन.
 कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेते यांचे खास आकर्षण — चित्रपट दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड, अभिनेते प्रशांत बोधगिरे, चित्रपट अभिनेत्री शिवानी कथले ,अंजली आकळे व रेणू रजपूत या कलाकारांची विशेष उपस्थिती. 
 सत्कारमूर्तींचा सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील मिळून 23 ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच 55 ते 60 विविध संस्थांच्यावतीने आणि शेकडो  सामान्य नागरिकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव झाला  विविध क्षेत्रांमधील मान्यवर, लहान मुले महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांसह कार्यक्रमासाठी हजारोंचा जनसागर लोटलेला होता.   शाही सोहळा या शब्दाला साजेसा असा अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न झाल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!