sangola

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार सर्वश्री डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजीतसिंह मोहिते – पाटील, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, शहाजी पाटील, राम सातपुते उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा प्रशासनास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
या इमारतीची उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणी केली व उपलब्ध सोयी सुविधांची माहिती घेतली. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी इमारतीची व त्यातील सोयी-सुविधांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदि उपस्थित होते.
प्रशस्त व सुसज्ज इमारत
ही देखणी इमारत प्रशस्त व सर्व सोयींनी सुसज्ज आहे. इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास १२ कोटी रूपये खर्च आला आहे. मुख्य इमारत जवळपास ७७२८ चौ. मी. आहे. यामध्ये पार्किंगव्यतिरीक्त दोन मजले आहेत. बाह्य व अंतर्गत पाणीपुरवठा, जलनिःस्सारण, विद्युतीकरण, संगणकीकरण ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत १९ शाखा स्थलांतरीत होणार आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. अभ्यागतांची, सर्वसामान्य नागरिकांचीही सोय होणार आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत 1986 मध्ये त्यावेळच्या गरजेनुरूप बांधण्यात आली होती. आता 36 वर्षानंतर ही इमारत अपुरी पडत होती. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयास नवीन इमारत आणि नवीन चेहरा प्राप्त झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!