३१ मे रोजी माऊलीच्या अश्वाचे अंकली येथून आळंदीकडे पायी प्रस्थान तर ११ जून रोजी माऊलीच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथून पंढरीकडे प्रस्थान

लाखो भाविकांच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊली अश्वाचे बुधवार दि. ३१ मे रोजी म्हणजेच निर्जला एकादशी दिवशी शितोळे- अंकली (ता. चिकोडी) येथून प्रस्थान होणार आसून वारकरी संप्रदायात १८३२ पासूनची ही समृद्ध परंपरा आसल्याचे श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.
सोहळा मार्गस्थ झाल्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथा पुढे जो अश्व चालत असतो.तो माऊलींचा अश्व व जो दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे २ अश्व माऊली पालखीच्या सोहळ्यात असतात. या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळे राजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे हे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी वाहनाने नव्हे तर पायी अंकली येथून चालतच आळंदी येथे दाखल होतात. त्यासाठीच यावर्षी ३१ मे २०२३ रोजी अंकली येथून अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान होईल व त्यानंतर ११ जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून अश्वाच्या पूजनानंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वाचे आळंदीकडे प्रस्थान होईल व ३१ मे रोजीचा मुक्काम मिरज, १ जून रोजी सांगलवाडी, दि. २ जून रोजी इस्लामपूर पेठनाका, दि. ३ जून रोजी वहागाव, दि. ४ जून रोजी भरतगाव, दि. ५ जून रोजी भुईंज, दि. ६ जुन रोजी सारोळा, दि. ७ जून रोजी शिंदेवाडी, दि. ८ व ९ जून रोजी पुणे व दि.१० जून रोजी आळंदी असा हा अश्वाचा पायी प्रवास असणार असल्याचे.श्रीमंत सरदार महादजीराजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले.
आषाढी एकादशी झाल्यावर जेव्हा गुरुपौर्णिमा दिवशी गोपाळ काल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळाचा परतीचा प्रवास चालू होतो, तेव्हा पंढरपूरच्या वेशीपर्यंत हे अश्व निरोप देण्यासाठी जातात व तिथून मग ते अश्व वाहनाने पंढरपूर येथून अंकलीकडे मार्गस्थ होतात.
——————-
असा हा राजाश्रय अन् वारीतील नियम व परंपरा
जेव्हा १८३२ मध्ये हैबतबाबांनी माऊलींचा सोहळा सुरू केला, तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे व हे अश्व हे रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात व त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माऊली अश्वावर कोणीही बसत नाही.
श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे सरकार (अंकलीकर )