बाळूमामाचे दर्शन घेऊन येताना अपघात; दोन जण जागीच ठार

सांगोला(प्रतिनिधी):- आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन आटोपून परतणार्या भाविकांची दुचाकी दुभाजकावर आदळून दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. विशाल कटाप व बसवराज गौडरू असे अपघातात मरण पावलेल्या दोघांची नावे असून रविवारी सायंकाळी 5:15 च्या सुमारास मिरज- सांगोला महामार्गावर काळूबाळूवाडी पुलावर हा अपघात झाला. या अपघातात शांतेश्वर शिरोळे हा जखमी झाला. याबाबत दीपक शिरोळे यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात तपास करीत आहेत.
शांतेश्वर शिरोळे, बसवराज गौडरूव विशाल कटाप हे तिघे जण, सागर पवार व दीपक शिरोळे हे दुचाकीने शनिवारी रात्री 12 च्या सुमारास सोलापूर येथून निघाले. अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेतले, रविवारी देवदर्शन आटोपून दुपारी 12 च्या सुमारास पाचही जण मिळून परत त्याच दोन दुचाकीवरून सोलापूरकडे मिरजमार्ग सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. सायं 5.15 च्या सुमारास त्यांची दुचाकी जुनोनीजवळ काळूबाळवाडी पुलाच्या दुभाजकाला जोरात धडकली.
या अपघातात विशाल कटाप हा दुचाकीवरून उडून खाली सर्व्हिस रोडवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला बसवराज गौडरू याच्याही डोक्याला मार लागून तोही जागीच ठार झाला. मात्र, शांतेश्वर शिरोळे हा तेथेच रस्त्यावर पडून जखमी झाला होता.