मुलीच्या लग्नामध्ये तब्बल एक लाख रुपयांची ग्रंथसंपदा उपस्थितांना भेट ; गुलाबराव पाटील यांचा कौतुकास्पद उपक्रम

महूद, ता. २५ : विवाह हा एक संस्कार आहे.विवाह सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे फेटे व हार देऊन स्वागत केले जाते.काही क्षणासाठीच्या या सत्कार कार्यक्रमावर कार्यमालकाचा अनाठायी खर्च होतो.सत्कारावरील हा अनावश्यक खर्च टाळत सांगोला येथील गुलाबराव पाटील यांनी मुलीच्या लग्नामध्ये अध्यात्म व वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी तब्बल एक लाख रुपयांची ग्रंथसंपदा उपस्थितांना भेट म्हणून देऊन एक अनोखा उपक्रम राबविला आहे.
विवाह हा एक संस्मरणीय सोहळा.वधू-वरांबरोबरच दोन कुटुंबाना जोडणाऱ्या या सोहळ्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने खर्च करून तो साजरा करत असतो.कायम स्मरणात राहणाऱ्या या सोहळ्यामध्ये आज अनेक अनावश्यक बाबींना महत्त्व आल्याचे दिसून येते.त्यापैकी प्री-वेडिंग शूटिंग या नवीन प्रकारावर अनेक समाजांमध्ये विचार मंथन सुरू आहे.काही समाजांनी तर यावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले आहे. या अनावश्यक बाबीवर होणारा खर्च व त्यातील बिभत्सपणा अनेकांना खटकतो आहे.त्यातूनच या प्रकारावर बंदी घालण्याची चर्चा सुरू आहे.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने छापल्या जाणाऱ्या महागड्या लग्नपत्रिका या सुद्धा हळूहळू कालबाह्य होताना दिसत आहेत. निमंत्रणासाठी समाज माध्यमांचा व फोनचा वापर प्रभावीपणे केला जात आहे.विवाह सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहतात.या मान्यवरांचा सर्रास सर्व लग्न कार्यामध्ये हार व फेटा बांधून सत्कार केला जातो.मुहूर्त,भटजी,
नवरा,नवरी,पाहुणेमंडळीना बाजूला सारून नेतेमंडळीची सत्कारघाई आणि विस्मरणातल्या सत्कारमुर्तींची नाराजी याचाही प्रश्न जटील होत आहे.त्यातच ज्या व्यक्तीस फेटा बांधला जातो,ती व्यक्ती काही क्षणापुरता हा फेटा आपल्या डोक्यावरती ठेवते.आणि लगेच फेटा काढून बाजूला ठेवला जातो.या फेट्याचा पुनर्वापर करता येत नसल्याने तो तसाच मंडपामध्ये पडून राहतो.शेवटी या सत्कार साहित्याचा कचराच होतो.सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक व जिल्हा ग्रंथालय संघटनेचे माजी अध्यक्ष,ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी आपली मुलगी साधना हिच्या नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यात या सत्कार समारंभावरील अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळला.त्या ऐवजी अध्यात्म व वाचन संस्कृती वाढावी यासाठी उपस्थित नातेवाईक,आप्तेष्ट,मित्रपरिवार यांना श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने असलेली पुस्तिका(ग्रंथ)भेट देऊन त्यांचा सन्मान केला आहे.सुमारे एक लाख रुपयाहून अधिक खर्च करत त्यांनी प्रवचनाच्या सुमारे एक हजाराहून अधिक प्रति उपस्थितांना भेट दिल्या आहेत.
संस्कार देणारे प्रसंग,पुस्तके आणि घटना आजमितीला दुर्मिळ होतायत. आहे.अशावेळी सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नव्या,जुन्या पिढीचा सुसंवाद साधावा.मनाचे नियमन बोधकथा,प्रवचन यांच्या माध्यमातून घडावे आणि विवाहानिमित्त आलेल्या सर्व स्नेहीजनांचा सत्कार योग्य भेटवस्तू देऊन व्हावा.या उदात्त हेतूने गुलाबराव पाटील यांनी हा उपक्रम राबवला आहे.नवनवीन शोधांमुळे नवीन सोयी निर्माण होत आहेत.परंतु त्यामुळे मानव खरंच सुखी झाला आहे का? जगातील स्पर्धा,द्वेष,मत्सर,लोभ,महत् वकांक्षा यामुळे मानव सर्व साधने असूनही सुखा पासून दूर जातो आहे.अशावेळी चांगले वाचन व चांगले विचारच माणसाला तारू शकतात. या पार्श्वभूमीवर श्री.पाटील यांचा हा उपक्रम महत्वाचा ठरतो आहे.