बापूसाहेब झपके हे गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ गुरु- प्रा. राजेंद्र ठोंबरे

सांगोला (प्रतिनिधी):- गुरु हा सर्व जगाचा त्राता असून गुरुमुळे समाज जीवन घडत जाते. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्यामुळे गेल्या शतकात सर्वांना शिक्षणाबरोबर समाज जीवनाचे धडे मिळाले .बापूसाहेबांनी शिक्षणाबरोबर साहित्य ,न्याय समाजकारण याबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात देखील मोलाचे कार्य केले आहे. तोच वारसा घेऊन प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके हे कार्य करत असून ते आमच्या पिढीचे गुरु आहेत .असे प्रतिपादन प्राध्यापक राजेंद्र ठोंबरे यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार रिटायर्ड ग्रुप व सरांचे विद्यार्थी असणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला. याचवेळी दुसरे गुरु प्रा. उत्तमराव घाटोळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना प्राध्यापक ठोंबरे म्हणाले की, गुरु ही संकल्पना शिक्षक या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून समाज जीवनात जगण्यास पात्र करतो मात्र गुरु हा विद्यार्थ्यास ज्ञानदाना बरोबर विविध क्षेत्रात सक्षम करून त्यास यशस्वी जीवन जगण्यासाठी पात्र बनवतो. प्रा. झपके यांनी बापूसाहेबाप्रमाणे आपले सहकारी व विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देताना.. राजकारण ,समाजकारण, नगर वाचन मंदिर, सांगोला लायन्स क्लब यासारख्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली. आज सरांचे अनेक विद्यार्थी समाज जीवनात वेगवेगळया पदावर काम करत असून आपला कार्यभाग यशस्वीपणे आणि समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळेच सरांचे स्थान हे गुरुतुल्या असून गुरुपौर्णिेनिमित्त गुरुगृही जाऊन सत्कार करताना आम्हास मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
या प्रसंगी रिटायर्ड ग्रुपचे विद्यार्थी सदस्य प्राध्यापक अमर गुळमिरे ,प्रकाश धोत्रे, भीमाशंकर पैलवान, ग्रुपचे मित्र सदस्य, उत्तमराव घाटोळे ,सुभाष महिममकर, तायाप्पा आदट, कमलाकर महामुनी उपस्थित होते.