घरामधुन रात्रीचे जेवण करुन फिरण्यासाठी बाहेर गेेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा खून; तालुक्यात सलग दुसर्या दिवशी दुसरा खून झाल्यामुळे खळबळ
सांगोला (प्रतिनिधी):- घरामधुन रात्रीचे जेवण करुन फिरण्यासाठी बाहेर गेेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात इसमाने, कोणत्यातरी अज्ञात धारदार हत्याराने, अज्ञात कारणावरुन डोक्यात व पाठीत मागील बाजुस वार करुन खून केला असल्याची घटना वासुद ता.सांगोला येथे घडली. सुरज विष्णु चंदनशिवे वय 43 वर्षे, रा.वासूद असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सांगोला तालुक्यात सलग दुसर्या दिवशी दुसरा खून झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सुरज चंदनशिवे हे दि.02 ऑगस्ट रोजी रात्री 09.15 वा. चे सुमारास वॉकिंगला बाहेर गेले होते. त्यानंतर त्यांचे पत्नीने मोबाईलवर संपर्क केला असता ते फोन उचलत नव्हते. यानंतर त्यांच्या पत्नीने चुलत भाऊ सौरभ चदंनशिवे यांना कळविले. त्यानंतर सौरभ चंदनशिवे, किरण तावरे, अमित केदार, दत्ता केदार, देश ऐवळे, अजित गोडसे यांनी सांगोला शहरातील बस स्थानक, कडलास नाका, वासूद चौक, वाढेगाव नाका व परीसरात शोध घेतला पण ते मिळून आले नाही. पुन्हा वासुद गावात जावून वासुद ते केदारवाडी रोडवर गाडीने शोध घेत असताना पहाटे 04/30 वाजणेचे सुमारास गाडीचे लाईटचे उजेडात हणमंत विद्यालयाचे पुढे काही अंतरावर केदारवाडी रोडवर रक्त सांडलेले त्यांना दिसून आले. जवळ एक चप्पलची जोड दिसून आल्याने गाडी थांबवुन जवळ पाहीले असता रोडवर रक्ताचे, फरफटलेले डाव्या बाजुस जाणारे व्रण दिसले. त्यामुळे बँटरीचे उजेडात सदर बाजुचे उसाचे शेतात पाहणी केली असता उसाचे शेतामध्ये अंदाजे 20 फुट अंतरावर दोन दंडातील चिखलामध्ये एक इसम पालथ्या परिस्थितीत डोक्यास व पाठीत मागील बाजुस मोठ्या प्रमाणात जखमा होवुन चिखलाने माखलेला व रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. त्यावेळी जवळ जावून त्यांचा चेहरा पाहीला असता ती व्यक्ती सुरज चंदनशिवे असल्याचे खात्री झाली. सुरज यास रुग्णवाहीकेने उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे आणले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सदरची फिर्याद सांगोला पोलिस स्टेशनला सौरभ चंदनशिवे यांनी दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सांगोला पोलिस करीत आहेत.