एन.सी.सी. विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांची सांगोला महाविद्यालयास भेट

सांगोला/प्रतिनिधी :पुणे एन.सी.सी. विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांनी सांगोला
महाविद्यालयास प्रशासकीय भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी एन.सी.सी. विभागाला भेट दिली व
कॅडेट्सना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या. छात्रांना दिल्या
जाणाऱ्या प्रशिक्षणाची त्यांनी माहिती घेतली तसेच फाईलची ही पाहणी केली. याप्रसंगी कॅप्टन
संतोष कांबळे यांनी त्यांना माहिती देताना सांगितले की गेल्या पाच वर्षात सांगोला
महाविद्यालयातील एनसीसी विभागातील 17 छात्र सैन्यामध्ये भरती झाले आहेत, तर १ छात्र
आसाम रायफल्स मध्ये भरती झाला आहे. मे 2023 मध्ये झालेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात
छात्रांनी भाग घेतला. त्यामध्ये १३ गोल्ड मेडल, ७ सिल्वर मेडल आणि १ ब्रांझ मेडल प्राप्त केले.
छात्रांच्या प्रशिक्षण व प्रगती बद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
त्यांनी एन.सी.सी छात्रांशी संवाद साधला व मार्गदर्शन करताना त्यांना सांगितले की,
एन.सी.सी. छात्रानी आपल्यासमोर देशसेवेचे उद्दिष्ट ठेवावे. महाविद्यालयीन स्तरापासून छात्रांना
सैन्य प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे की, छात्रांमध्ये शिस्त व एकता जागृत करणे, देश सेवेसाठी
कटिबद्ध राहणे व आपले नैतिक जीवन उंचावणे असा आहे. पुढे ते म्हणाले की, एन.सी.सी. प्रशिक्षण
घेत असताना महाविद्यालयीन अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. उत्तम अध्ययन करून उत्तम
श्रेणीची पदवी संपादन करा व त्याचबरोबर एन.सी.सी प्रशिक्षण पण उत्तम दर्जाचे घ्या. भारत हा
तरुणांचा देश आहे. तरुणांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. भविष्यात भारत एक महासत्ता
म्हणून उदयास येईल, त्यामध्ये एन.सी.सी छात्रांचे योगदान मोलाचे असेल असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
या भेटीमध्ये 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर राजेश गजराज
उपस्थित होते. याशिवाय सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, कार्यालयीन
अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी
यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे छात्र या कार्यक्रमात
सहभागी झाले होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॅप्टन संतोष कांबळे व केअर टेकर
डॉक्टर जे. व्ही. ठोंबरे व एन.सी.सी सीनियर कमांडिंग ऑफिसर स्वप्निल जाधव, ज्युनियर अंडर
ऑफिसर आदित्य सावंत, प्रणाली सोळगे व सर्व छात्रांनी परिश्रम घेतले.
जा.क्र.समक्ष/2023-24 दिनांक:12/09/2023