नागनाथअण्णा आणि गणपतआबा यांच्या मुळे दुष्काळी तालुके ही ओळख पुसली-वैभवकाका नायकवडी

सांगोला येथे 32 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न

सांगोला:- नागनाथअण्णा आणि गणपतआबा यांच्या मुळे दुष्काळी तालुके ही ओळख पुसली असून चळवळीच्या जोरावर ज्या योजना कागदावर नव्हत्या त्या कागदावर आल्या एवढे मोठे काम चळवळीचे आहे.  पाणी संघर्ष  चळवळीमुळे काही भागात पाणी फिरले तर काही योजनांची कामे झाले असून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी बघणार मगच ही चळवळ थांबणार असल्याचे प्रतिपादन पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांनी व्यक्त केले.

सांगोला येथे काल बुधवार दिनांक 26 जून रोजी रामकृष्ण लॉन्स व्हीला येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्‍यातील तेरा दुष्काळ ग्रस्त तालुक्यामधील आणि विशेषतः आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व  जत तालुक्यातील जनतेची 32 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न झाली.

प्रारंभी शाहू महाराज, क्रांतीवीर कै.डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी, कै.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपिठावर राजेंद्र देशमुख,  डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.बाबुराव गुरव, सुभाष पाटील, चिटणीस दादाशेठ बाबर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी निमंत्रक वैभवकाका नायकवडी बोलत होते.

वैभवकाका नायकवडी पुढे म्हणाले, एवढे कष्टाने पाणी मिळवले  ते टिकवणे सुध्दा गरजेचे आहेत. वेगवेगळ्या  योजना निधीअभावी अपूर्ण आहेत.त्या योजनांसाठी निधीची उपलब्धता महत्वाची आहे तसेच वीज बिले, वाढीव पाणी पट्टी हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहे त्या दृष्टीने यापुढील काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली सर्वांची शक्ती महत्वाची असून संघटनही महत्वाचे आहे.सरकार कोणतेही असो संघटन असणे गरजेचे आहे. संघटन असल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा हा लढा यशस्वी करायचा असेल तर शेवटच्या माणसाने सुध्दा सहभागी होणे गरजेचे आहे. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी हाऊसमध्ये आता माणसे वाढवायला पाहिजे. जिथं जिथं संधी असेल तिथे  चळवळीतल्या माणसांसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे.चळवळीच्या लोकांना यशस्वी करण्यासाठी निवडणुकीचा उपयोग करुन ठराव सोडविण्यासाठी ताकद लाऊया.असेही आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरुन प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, 32 वर्षे चळवळ सुरू आहे. चळवळीचे फायदे बर्‍यापैकी झाले आहेत. पाणी शेवटच्या टोका पर्यंत आले आहे. शेवटचे टोक मंगळवेढा आहे.त्यामुळे योजनेस गती मिळाली पाहिजे.नागनाथअण्णा आणि आबानी पाण्याचे महत्व ओळखले म्हणून पाण्याचा लढा सुरू झाला असे सांगत ज्या दुष्काळी भागाला पाणी मिळणे शक्य नव्हते हे आज पाणी परिषदेमध्ये सत्य स्वरूपात पाहवयास मिळत आहे. नुसत्या नद्या वाहून चालणार नाही तर हे पाणी शेतकर्‍यांच्याशेतात गेले पाहिजे. शेतात पाणी आले तर शेतकर्‍यांची  समृध्दी बघायला मिळेल. अपूर्ण कामे येत्या वर्ष भरात झाली पाहिजे. गावात पाणी आले म्हणून काम संपले असे नाही तर सर्वांनी चळवळीत पुन्हा ताकदीन उतरले पाहिजे व जनशक्तीचा रेटा दाखविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा.बाबुराव गुरव म्हणाले, सरकार फक्त एकसंघ चळवळीला भित असते बाकी कुणाला भित नाही, सरकारने ठरविले तर सहा महिन्यात कृष्णेचे पाणी लातूर पर्यंत जाऊ शकते. कृष्णेच्या पाण्यावर लातूर च्या लोकांचा सुद्धा अधिकार आहे.चळवळ रस्त्यावर गेल्याशिवाय लवकर पाणी येणार नाही.पावसाळ्यात अनेक नद्यांना महापूर येतो ते पाणी दुष्काळी भागाकडे वळवा आणि तलाव भरून द्या तेव्हा आमचे सर्व प्रश्न मिटतील. शेतकर्‍याच्या अंगात पाणी असेल आणि नेत्याची तळमळ असेल तर पाणी मिळेल. काळ बदलत असून सरकारही बदलत आहे.गणपत आबा गेल्यामुळे सर्वांचे फवले आहे. सरकारला आता जाब विचारायची वेळ आता आली आहे.चळवळ बळकट करूया..राजकारणीच चित्र उभी करतात ती खोटी आहे..त्याचा उपयोग नाही.आपले प्रश्न घेऊन आता आपल्यालाच लढवे लागेल,संघटना उभी करावी लागेल तर सर्व प्रश्न मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.राजेंद्र देशमुख म्हणाले, पाणी परिषदेस यश आले पण 100 टक्के आले नाही..वंचित लोकांना पाणी देणे गरजेचे आहे त्यासाठी  पाणी परिषदेस उपस्थिती वाढविणे गरजेचे आहे.निवडणुकीमध्ये पाणी सुटले जाते..हे दुर्देवी असून अण्णा आणि आबासाहेब ही दोन चाके फिरली म्हणून आपल्या सर्वांच्या संघर्षास यश आले. एकत्र आलो तर प्रश्न सुटतील असे सांगत संघटना टिकवण्यासाठी या पुढे सर्वांनी एकत्र आले पाहिजे …येणार्‍या ग्रामसभेत सर्व 13 तालुक्यात नामांतरचा ठराव घ्या मग बघू कसे नाव देत नाहीत असे सांगून जास्तीत जास्त उठाव झाला पाहिजे यांची जबाबदारी आपली असून पाणी परिषदेस लोक का येत नाहीत यांचे आत्मचिंतन करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आर.एस.चोपडे सर म्हणाले, पाणी संघर्षाचा 32 वर्षे लढा चालला आहे. प्रबोधन झाल्यामुळे चळवळ यशस्वी झाल्या असून पाणी येण्याचे श्रेय फक्त अण्णा व आबासाहेब यांचे आहे. पाणी संघर्ष समितीमुळे सरकारचे डोके ठिकाणावर आले असून निधीही मिळाला. पाणी संघर्ष समितीची तत्वे अण्णा व आबासाहेब यांनी जपली ती तत्वे आता आपण जपली पाहिजेत.
यावेळी  टेंभू योजनेचे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी असे नामकरण करणेत यावे,सर्व योजनांच्या कामास गती देवून, अपुर्ण कामे मुदतीत पुर्ण करावीत, सांगोला तालुक्यातील खवासपुर, लोटेवाडी, कटफळ, अचकदाणी, लक्ष्मीनगर, य.मंगेवाडी अजनाळे व इतर 12 गावांचा टेंभू  अगर जिहे-कठापूर योजनेमध्ये समावेश करावा व त्यासाठी राजेवाडी तलाव भरण्याची सोय करावी, म्हैसाळ उरमोडी या सारख्या उपसा सिंचन योजनांचे सर्व पंप कार्यान्वीत करुन दुष्काळी भागातील सर्व तलाव, के.टी.वेअर तळी भरुन घ्यावीत, टेंभूचे पाणी वाढेगावपर्यंत आलेले आहे ते पाणी धर्मगाव बंधार्‍यापर्यंत सोडण्याची तरतूद करावी, माण भीमा व  कोरडा या नद्यांना कॅनालचा दर्जा द्यावा, सर्व योजनावर सौर उर्जेचे प्रकल्प उभे करावेत यासह 15 ठराव एकमुखाने टाळ्यांचा गजरात हात वर करुन एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब नायकवडी, प्रा.दत्ताजीराव जाधव, प्रा.दादासाहेब ढेरे, सुनील पोतदार, अ‍ॅड.सर्फराज बागवान, श्री.विश्वंभर बाबर, राजलक्ष्मी गायकवाड, श्री.अनिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाणी परिषदेस शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

————————–

स्व.नागनाथ अण्णा व आबासाहेब यांनी लोकांच्या समवेत मोर्चे  व आंदोलन केल्यामुळे दुष्काळी भागातील  बर्‍याच योजना पूर्णत्वास आल्या. पाणी परिषदेच्या जोरावर तालुक्यातील 70 टक्के जमिनी ओलिताखाली आल्या असून पाणी परिषदेचा कोणताही प्रतिनिधी आज विधी मंडळात नाही यांचे दुःख असून येणार्‍या काळात पाणी परिषदेतील प्रतिनिधी नक्की विधी मंडळात दिसतील
डॉ.बाबासाहेब देशमुख

————————–

आजचा दिवस म्हणजे 13 तालुक्यासाठी सुवर्ण दिवस आहे.पुरोगामी विचारामुळे या चळवळी बघायला मिळाल्या. कठीण काळ सर्वांनी पहिला असला तरी  दुष्काळी भागाचा प्रश्न आज शेवटच्या टप्प्यात आला आहे.शेतकर्‍याच्या गावापर्यंत रस्ते करू शकता मग शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पाणी का देवू शकत नाही असा सवाल उपस्थित करुन ही चळवळ शेतकर्‍यांचा कणा बनून पुढे घेऊन जावी लागणार आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत ही चळवळ अखंड पणे सुरू ठेवावी लागणार आहे.
डॉ.अनिकेत देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button