सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची निवड..!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा एकदा पक्षात अनेक वर्षे संघटना वाढीत निर्णायक काम केलेले मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दि १२ ऑक्टोंबर रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मान्यतेने मुंबई येथील पक्ष कार्यालयात याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना दिले आहे. यावेळी माजी खासदार व मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते उमेश पाटील, कार्यालयीन कोषाध्यक्ष संजय बोरगे, सुरेश आबा पालवे, प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते.

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे पक्ष संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सलग ८ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पद भूषविले आहे. याशिवाय ६ वर्षे विधान परिषदेचे आमदार, ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्षपद आणि ३ वर्षे नवी मुंबईचे निरीक्षक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यात सिंहाचा वाटा असलेले मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची पुनश्च जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संघटना वाढीचा अनेक वर्षांचा अनुभव असलेला खमक्या अध्यक्ष पक्षाला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे प्राबल्य आणि सोलापूर जिल्ह्यातील मतदार संघात असलेल्या लोकसभा मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून देण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यांच्या २४ तास पक्षाचे काम करण्याच्या पद्धतीने सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पुन्हा एकदा संघटनेतील कामाचा दांडगा अनुभव असलेल्या मा. आम. दिपकआबांची जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भरारी घेईल असा विश्वास कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.

 

१) पदाला न्याय देऊन वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार

अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम करण्याचा आपल्याला अनुभव आहे. आजवर ज्या ज्या पदावर आपण काम केले, त्या पदाला न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्या विश्वासाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याला दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करू ;

मा आम दिपकआबा साळुंखे पाटील
नूतन जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!