नीरा उजवा कालव्यातून सांगोल्याच्या हक्काचे पाणी फाटा ५ ला तात्काळ सोडावे ; तानाजी काका पाटील

नीरा उजवा कालव्याचे पाणी हे सांगोला तालुक्याच्या हक्काचे आहे. आम्ही कुणाच्याही वाट्याचे किंवा अनधिकृत पाणी मागत नाही. अस्थरीकरणतातून वाचलेले आमच्या हक्काचे पाणी आम्हाला ८ दिवसाच्या आत तात्काळ सोडावे अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील यांनी दिला आहे.
चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना रब्बीकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. रब्बी हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता संजय बोडके यांच्याकडे मागणी करणार आहे.
आम्ही कुणाचेही पाणी मागत नाही आणि आमचे पाणीही कुणाला मिळू देणार नाही. आमच्या वाट्याला असलेले पाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवू त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. नीरा उजवा कालव्याच्या अस्थरीकरणातून वाचलेले असलेले २ टी एम सी पाणी आमच्या हक्काचे आहे. हे पाणी सांगोला शाखा कालव्यातून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करायलाही आपण मागेपुढे पाहणार नाही असेही यावेळी तानाजी काका पाटील यांनी सांगितले.