वीजबिल न भरल्याने शेतकऱ्यांचं कनेक्शन कापण्याच्या महावितरणच्या मोहिमेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ब्रेक

वीजबिल न भरल्याने शेतकऱ्यांचं कनेक्शन कापण्याच्या महावितरणच्या मोहिमेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावलाय. शेतकऱ्यांकडील कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असून चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवले जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी चालू विज बिल भरलेलं असेल त्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. राज्यात एकूण ४४ लाख ५० हजार इतके कृषी पंप वीज कनेक्शन कार्यान्वित आहेत. यापैकी ४० लाख वीज कनेक्शनवरती थकबाकी आहे. अशा परिस्थितीत थकबाकीदार शेतकऱ्यांचं कनेक्शन जर महावितरणने खंडित केली तर लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असता. मात्र आता राज्य सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याचा धडाका महावितरणने लावला होता. हा धडाका थांबवावा, अशी मागणी लाखो शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी करत होते. एकीकडे बळीराजा अतिवृष्टीने संकटात सापडलेला असताना, प्रचंड नुकसान झालेलं असताना बळीराजाने वीजबिल कसं भरायचं?, असा सवाल शेतकरी विचारत होते. अस्मानी संकट उभं ठाकलेलं असताना शासनाने अशा काळात वीजबिलांचा तगादा लावू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते. याच पार्श्वभूमीवर वीजबिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे.