सांगोला तालुक्यात २५ कुणबी मराठा , मराठा कुणबीचे सापडले पुरावे

सांगोला -मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यातील ८ गावातील मोडीतील ६ लाख पानाच्या केलेल्या तपासणी नोंदीत एकुण २५ कुणबी मराठा , मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख ( पुरावे )सापडले आहेत.सदर पुरावे शोध मोहीम सन १९६७ पूर्वीचे सर्व अभिलेखे संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशिक्षणार्थी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
मराठा समाजातील समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगोला तहसील कार्यालयातील अभिलेखा गार मध्ये ६ नोव्हेंबर पासून नायब तहसीलदार ,लिपिक, मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत १० महसूल मंडलातील सन १९६७ पूर्वीचे मोडीतील विविध प्रकारच्या नोंदी, दस्तऐवज कागदपत्राची तपासणी चालू असून , आत्तापर्यंत सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द, बामणी, चिकमहूद, मेथवडे, राजापूर, वाढेगाव, डोंगर पाचेगाव , चोपडी या गावातील सुमारे ६ लाख पानाच्या नोंदी तपासल्या आहेत यामध्ये २५ नोंदी मराठा कुणबी, मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख( पुरावे )सापडले आहेत दरम्यान सन १८८० ते १९२० या काळातील नोंदी व दस्तऐवज मोडी ( लिपीत ) भाषेत असल्यामुळे तपासणीसाठी मोडी लिपीचे जाणकार यांचीही मदत घेतली जात आहेत.
सदर तपासणी मोहीमेत नायब तहसीलदार ,२ लिपिक, १० मंडल अधिकारी,४२ तलाठी व १० कोतवाल असे ६५ अधिकारी कर्मचारी मिळून सन १९६७ पूर्वीचे महसुली अभिलेखामधील कडई पत्रक, जन्म- मृत्यू नोंदणी, नमुना १४ तत्कालीन सातबारा / फेरफार व इनाम पत्रे, पीक पाहणी या दस्त ऐवजाची तपासणी करून पुरावे शोधले जाणार असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
————————————–
चौकट -सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत सांगोला तालुक्यामध्ये कुणबी मराठा नोंदी कमी आढळल्याचे निदर्शनास आले परंतु सांगोला तालुक्याचा इतिहास पाहिला तर सांगोल्याचा काही भाग जसे डफळे सरकार , औंध संस्थान आणि सातारा जिल्हा अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्यामुळे ‘ कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी सापडू शकतात. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन वरील ठिकाणी नोंदी तपासल्यानंतर पुरावे मिळतील – अरविंद केदार ,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष