पाचेगांव खुर्द येथे छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

पाचेगांव(प्रशांत मिसाळ):-काल रविवार दि. 19 रोजी मराठा समाज आणि ओबीसी समाज यांनी सामूहिकरीत्या पाचेगांव खुर्द येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी “मनोज जरांगे पाटील आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है” , एक मराठा, लाख मराठा”अशा देण्यात आल्या.

राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने चालू आहेत. मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून मराठा समाज तसेच ओबीसी समाज बांधवांकडून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. परंतु ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी अंबड जिल्हा जालना येथील ओबीसी मेळाव्यातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केल्यामुळे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून त्या अनुषंगाने पाचेगांव खुर्द ता. सांगोला येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गटारीमध्ये दहन करून रोष व्यक्त करण्यात आला.

सकाळी 9 वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर येथे गावातील मराठा समाजातील व ओबीसी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा बांधवांनी छगन भुजबळ यांचा फोटो काठीला बांधला त्यावरती पेट्रोल टाकले आणि ओबीसी समाजातील व्यक्तीने त्यांच्या काठीला बांधलेल्या प्रतिमेला आग लावली आणि मराठा व ओबीसी एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दाखवून दिले.
गावगाड्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकच असून आमच्यात भांडण लावण्याच्या प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांनी करू नये व संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला न शोभणारे वक्तव्य करू नये असे यावेळी बोलताना मराठा समाज आणि ओबीसी समाजातील बांधवांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांनी यापुढे मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाविषयी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला.