उद्योजक सुरेश पवार यांना कोल्हापूर येथे ‘महात्मा फुले कृषिरत्न’ पुरस्कार प्राप्त.

कोल्हापूर येथील संविधान विचार मंच कोल्हापूर आणि लोकहिरा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन तसेच संविधान दिना निमित्त सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वाटंबरे गावचे युवा उद्योजक यशराज गांडूळखत प्रकल्पाचे संचालक श्री सुरेश वसंत पवार यांना महात्मा फुले कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर्जेराव गायकवाड, डॉ. प्रवीण कोडोलीकर, हनुमंतराव सोनवणे, विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सुरेश पवार यांनी सुरू केलेल्या यशराज गांडूळ प्रकल्पात तयार होणारे दर्जेदार गांडूळ व वर्मी वॉश याच्या दर्जा विषयी माहिती व खात्री महाराष्ट्रभर पसरली आहे. पाच गांडूळ बेड पासून सुरू झाला हा प्रवास शंभर गांडूळ बेडच्या पर्यंत पोहोचत आला आहे. विविध फळपिके व पालेभाजीपिके पीकवणाऱ्या शेतकऱ्यांकडून यशराज खतास मागणी असते.
यापूर्वीही त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श उद्योजक, स्वर्गीय वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार नाशिक आणि इन्स्पायर अवॉर्ड नाशिक यांसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषीरत्न पुरस्काराने त्यांच्या सन्मानात आणखीन भर टाकली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल वाटंबरे गाव आणि पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.