सावे माध्यमिक विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले . सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे दैवत सरस्वतीच्या फोटोचे पूजन सांगोला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री गायकवाड ,सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री शिवाजी वाघमोडे व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री शेळके सर यांनी केले. त्यानंतर या शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विस्तार अधिकारी मा.गायकवाड व लोकनियुक्त सरपंच मा.श्री शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.
त्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री गायकवाड साहेब यांचे स्वागत व सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी शाल, श्रीफळ व गुलाब फूल देऊन केले तसेच सावे गावचे लोकनियुक्त सरपंच मा.श्री शिवाजी वाघमोडे यांचे स्वागत व सत्कार विद्यालयातील लिपिक श्री शेंडगे सर यांनी श्रीफळ व गुलाब फूल देऊन केले.
त्यानंतर उद्घाटन पर मनोगतात विस्तार अधिकारी मा.श्री गायकवाड साहेब यांनी हे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्याचा हेतू व उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सांगितले .यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते .विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाविषयीच्या नवनवीन संकल्पना दृढ होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना चालना मिळण्यास मदत होते आणि यातूनच भविष्यात असे विद्यार्थी वैज्ञानिक बनून नवनवीन संशोधन करतील अशी आशा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील एकूण 59 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला होता .या विज्ञान प्रदर्शनामध्ये पवनचक्की, पाण्यावरील दिवा, विराम अवस्थेचे जडत्व ,फळे तोडण्याचे यंत्र, ज्वलन सहाय्यक ऑक्सिजन, इलेक्ट्रिक मिक्सर ,जलशुद्धीकरण, कुलर, हवेच्या दाबाचा प्रयोग ,स्थितीक विद्युत बल, न्यूटनची तबकडी ,गवत कापण्याचे यंत्र ,ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज ,पाण्याचा दाब ,जेसीबी मॉडेल निर्मिती ,कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती, पाणबुडी तयार करणे, गरम हवेचा दाब ,जादूचे कारंजे ,घर्षण बल निर्मिती, फुफुसाचे कार्य सांगणारी प्रतिकृती ,तत्कालीन बेल इत्यादी प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले होते.
हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावीर गडदे वस्ती ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे तसेच वाड्यावस्तीवरील इतर शाळा आल्या होत्या. सदर विज्ञान प्रदर्शन पाहून मुले आनंदित झाली होती .त्यांच्या मनामध्ये आपणही असे साहित्य तयार करू असा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झाला तसेच त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होण्यास मदत झाली. विद्यालयातील या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री अनुसे सर, श्री बर्गे सर, श्री गावडे सर, व श्री मेटकरी सर यांनी केले
सदर विज्ञान प्रदर्शन पार पाडण्यासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री मेटकरी सर यांनी मांडले .सदर शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यालयातील तसेच गावातील व वाड्यावस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.