मराठा आरक्षण दिंडीचे पंढरपूर मोठ्या संख्येने प्रस्थान
गावोगावी मराठ्यांचे जंगी स्वागत; वाटंबरे येथील मराठ्यांचा स्तुत्य उपक्रम

पाचेगांव/प्रशांत मिसाळ:
मनोज जरांगे पाटील यामच्या लढ्याच्या समर्थनार्थ काल शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 7 वाजता दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले. यावेळी तरुण, वृद्ध तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.
सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पाचेगांव खुर्द ता. सांगोला ते पंढरपूर पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता उपोषण स्थळापासून या दिंडीची सुरुवात झाली त्यानंतर हॉटेल चांदणी येथे नाष्टा करून वाटंबरे येथील खंडोबा मंदिरात दुपारी 1 वाजता जेवण करून सांगोला मध्ये दुपारी 5 वाजता पोचली.
यावेळी सांगोला मधील सकल मराठा बांधव या दिंडीत सामील झाल्यानंतर दिंडीतील मराठा बांधवांच्या वतीने शहरातील महात्मा फुले चौकातील सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार कणसे यांना निवेदन देऊन, सांगोलाचे ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरात दर्शन घेऊन व चहा घेऊन मराठा आरक्षण दिंडी मेथवडे कडे मुक्कामासाठी प्रस्थान झाली.पहिल्या दिवशी दिंडीतील सर्वांचा उत्साह अगणित होता आणि तो दुसऱ्या दिवशीही द्विगुणित होईल असे दिंडीतील वारकऱ्यांनी सांगितले व दुसऱ्या दिवशी दिंडीत अजून बहुसंख्य मराठ्यांनी सहभागी व्हावे हे आवाहन ही करण्यात आले आहे.