वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उत्सव: पो. नि. अनंत कुलकर्णी
सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक,प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

सांगोला (प्रतिनिधी) वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उत्सव आहे. अशा कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती वाढते. विविध गुण वाढीस लागण्यास आणि सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यानी अवश्य भाग घेतला पाहिजे असे मत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सांगोला विद्यामंदिर बालक मंदिर,पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर इनर क्लबच्या अध्यक्षा सविता लाटणे,संस्था सचिव म.शं.घोंगडे, संस्था खजिनदार शं.बा. सावंत, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सरिता देशमाने सांस्कृतिक विभाग प्रमुख-अजित मोरे, चेतन कोवाळे विद्यार्थी प्रतिनिधी-अमेय वलेकर, विराज टेळे विद्यार्थीनी प्रतिनिधी-वैष्णवी खंदारे, श्रावणी लवांडे विज्ञान प्रदर्शनाचे परिक्षक यतिराज सुरवसे, डी. एल सुरवसे, कला प्रदर्शनाचे परीक्षक संदिप शहा नूतन विद्यालय,आष्टी ता. मोहोळ, प्रतिभा मस्तुद,वासूद-अकोला आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले की, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक व इंग्रजी माध्यमातील विदयार्थी हे विविध स्पर्धेत सहभागी होवून गुणवत्तेची चुणूक दाखवित असतात. आज विद्यार्थ्याने केलेली विज्ञान प्रदर्शनाची मांडणी आणि कलाप्रदर्षणाची मांडणी उत्कृष्ठ आहे. नेहमीच आदर्श आणि गुणवत्ता घडविणारे विदयार्थी घडविण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील शिक्षक प्रयत्न करीत असतात. मी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शशिल ढोले पाटील यांनी केले तर आभार संगमेश्वर घोंगडे यांनी व्यक्त केले.
आज दुसऱ्या दिवशी सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय, बालक मंदिर यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सांगोला शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक , पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी केले आहे.