राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत दक्षता घेतली जाते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आजारांची माहिती नसते, त्यामुळे काही आजार नकळत बळावत जातात आणि पुढील काळात विद्यार्थ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.विद्यार्थ्यांना पुढील जीवनात आरोग्य विषयाची माहिती व्हावी तसेच छोट्या-मोठ्या आजारांबाबत त्यांच्या पालकांना माहिती व्हावी यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला जातो.आज नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. देवदत्त पवार,,आरोग्यसेविका अश्विनी काशीद औषध निर्माण अधिकारी अमृता रसाळ यांच्या माध्यमातून करण्यात आली.
सदर आरोग्य तपासणीमध्ये रक्त कमी असणे,अशक्तपणा असणे, सर्दी ताप खोकला तसेच विविध प्रकारच्या शारीरिक बाबींविषयीची जागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली. काही विद्यार्थ्यांवर औषध उपचार करण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना पुढील तपासणी करण्याच्या सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या.
सदर आरोग्य तपासणीसाठी प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व शाळेचे आरोग्य विभागाचे प्रमुख दिलीप सरगर उपस्थित होते. राष्ट्रीय बालशास्त्रीय कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्याबाबत पालकांमधून आरोग्य विभागाचे व शालेय प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे.