आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मांस विक्रीस मनाई, ‘या’ काळात राहणार विक्री बंद

आषाढी यात्रा सोहळा जवळ आला आहे. लाखो वारकरी पालख्यांच्या सोबत पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. या सोहळ्यानिमित्त प्रशासनाने पंढरपूर शहरात 16 ते 20 जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री तसेच प्राणी कत्तल यावर बंदी घालण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिले आहेत.
आषाढी यात्रा कालावधीत 18 ते 20 लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी शहरात येत असतात. यामुळं शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 अन्वये दिनांक 16 ते 20 जुलै 2024 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.
17 जुलै रोजी आषाढी एकादशी
यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. यावर्षी प्रथमच भंडीशेगाव , वाखरी या पालखी मार्गावरील इमारती , झाडांना आकर्षक विद्युत रोषणाई करून लाखो भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचल्यावर इसबावी , कॉलेज चौक , चंद्रभागा वाळवंट , भाविकांचे निवासस्थळ असणारे 65 एकरावरील भक्तिसागर अशा विविध ठिकाणी हे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यासाठी विविध जागांची पाहणी केली असून पालखी सोहळे येण्यापूर्वी ही विद्युत रोषणाई पूर्ण केली जाणार आहे.