खडतर परिस्थितीतून गुणवत्ता संपादनाचा संस्कार विद्यामंदिरने रुजवला – पो.अ.प्रितम यावलकर
सांगोला (वार्ताहर) सांगोल्यासारख्या अवर्षणग्रस्त भागामध्ये गुणवत्तेचा दुष्काळ कधीच पडला नसून अतिशय खडतर परिस्थितीतील होतकरू विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता संपादन करण्याचा संस्कार आज विद्यामंदिर परिवारातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला, नाझरा विद्यामंदिर प्रशाला आणि कोळा विद्यामंदिर हायस्कूल यासारख्या शाळांमुळे रुजला असल्याची भावना सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) शिष्यवृत्ती व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती संपादन करणाऱ्या 134 विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांच्या सन्मान प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, डॉ.सौ.अंबिका यावलकर, पोलीस उपअधीक्षक विक्रांतजी गायकवाड सो., पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे सो., यांच्यासह सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, कार्यकारिणी सदस्या सौ.शीलाकाकी झपके, संस्थासदस्या सौ.राजश्री प्रफुल्लचंद्र झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, प्राचार्य श्रीकांत लांडगे उपस्थित होते.
पुढे बोलताना पो.अ.प्रितम यावलकर यांनी सध्या शैक्षणिक क्षेत्रात कमालीचे व्यावसायिकीकरण होऊन देखील पूर्णपणे मोफत मार्गदर्शन करत सेवाभाव जपणाऱ्या विद्यामंदिरसारख्या संस्था फारच अल्प प्रमाणात असून विनादेणगी आणि फक्त गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरतीबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांमधील सदगुणांना बहार देण्याचे काम करणाऱ्या या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी भाग्यवंत असून तुम्ही विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चित करावे व त्या दृष्टीने अविरत प्रयत्नातून ध्येयसिद्धी करावी असा मौल्यवान संदेश यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष प्रात:स्मरणीय, परमपूज्य, कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पाहुण्यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड न करण्याचे व्रत स्थापनेपासून संस्थेने अद्यापपर्यंत जोपासले असून स्वातंत्र्योत्तर काळात 1952 साली समाजसुधारणेकरिता विद्यार्थी-विकासाच्या ध्यासातून सांगोला व परिसरामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेबांनी माध्यमिक विद्यालये उभारली,आज त्या रोपट्यांचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून दहा हजारच्या जवळपास विद्यार्थी या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत असल्याचे सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी भरघोस शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणारी असल्याचे ओळखून सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीसंख्या ‘शंभरी पार’ करण्याचे दिलेले उद्दिष्ट सर्व शिक्षकांनी मोठ्या कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक पूर्ण केल्याबद्दल शिक्षक आणि प्रशासनाचे यावेळी प्रा.झपके यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य सेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारीपदी विराजमान असणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते आज प्रशालेतील स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा योग मनस्वी आनंद देणारा असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त करत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन तसेच कोळा, नाझरा व सांगोला येथील शिक्षकवृंद व लिपिक, संस्था व प्रशालाबाह्य विभाग प्रमुख, प्रशासकीय विभाग नियंत्रक व प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य अमोल गायकवाड यांनी मानले.
सूत्रसंचालन आशितोष नष्टे व पारितोषिक वाचन वैभव कोठावळे यांनी केले.
याप्रसंगी सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. शाहिदा सय्यद, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे, कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक चारुदत्त जगताप यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव यांच्यासह बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.



