सांगोला येथील आठवडा बाजारात चोऱ्यांचे सत्र सुरूच; सांगोला पोलीस शहर बीटच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर.
नूतन पोलीस निरीक्षक यांच्या भूमिकेकडे लक्ष.!

सांगोला शहरातील रविवारचा आठवडा बाजार हा मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य शहरवासीयातून सांगोला पोलीस स्टेशनच्या शहर बीट ने लक्ष घालण्याची मागणी व्यक्त होऊ लागली आहे रविवारी होणाऱ्या आठवडा बाजारात चोरटे मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी आपला हात साफ करत असल्याच्या घटना घडत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून दर रविवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरी होण्याचे प्रकार वाढत आहेत तर मोबाईल चोरीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना संबंधित पोलीस कर्मचारी यांच्याकडून प्रश्नांचा भडीमार करण्याचे प्रकार सुरू असल्याचे देखील कळते आरोपींचा शोध घेण्याऐवजी फिर्यादी ची उलट चौकशीचा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक नागरिक चोरीची तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून रविवारचा आठवडा बाजारात असंख्य मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले आहेत मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आले असल्याचे दिसून येत असून गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडा बाजारातून मोबाईल,पर्स,दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता शहरवासीय, नागरिक व्यापारी हैराण झाले आहेत अचानकपणे मोबाईल, पैसे चोरीस गेल्याने अनेकदा आठवडा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सांगोला शहर बीट पोलिसांनी आठवडा बाजारातील गस्त वाढवावी अशी मागणी व्यक्त होत आहे सोबतच सांगोला पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक याबाबत काही उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला शहरात प्रत्येक रविवारी होणाऱ्या आठवडा बाजारात मोबाईल चोरी व मौल्यवान वस्तू , दागिन्यांच्या चोरींचे प्रमाण वाढले असून या घटनांचा अपवाद वगळता तपास लागत नसल्याने असे चोरीचे प्रकार घडल्यास अनेक नागरिकांनी सांगोला पोलीस ठाण्याला तक्रार नोंदविण्यास देखील नकारात्मकता दाखवली आहे सांगोला पोलिसांनी या सर्व प्रकारावर नूतन पोलीस निरीक्षक काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.