सांगोला येथे महिला उद्योजकता मेळावा संपन्न

कोळा : कोळा जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून कै. ॲड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच कोळे यांच्या वतीने तालुक्यातील महिलांसाठी महिला उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवावार्धिनी पुणे चे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून परिवतर्न उद्योग सांगलीच्या संचालिका कल्याणीताई गाडगीळ या उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा करांडे, सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, मा.जि.प. सदस्य गजेंद्र कोळेकर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विलासराव देशमुख, सांगोला पंचायत समितीचे मा. उपसभापती संतोष देवकते, स्वावलंबी भारत अभियानाचे अरविंद दोरावत, सेवा वर्धिनी पुणे च्या उमा व्यास, भा.स्त्री. शक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या ॲड. राजेश्वरी केदार, माता बालकच्या वसुंधरा कुलकर्णी, तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश माळी आदी मान्यवर उपस्थित.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राजेश्वरी केदार यांनी केले त्यांनी प्रस्ताविकामध्ये बचत गटाच्या महिलांनी बचती सोबतच आर्थिक नियोजनाकडे वळायला हवे व त्यातूनच नवनवीन उद्योग व्यवसाय चालू करावेत असे सांगितले. यानंतर मा. जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले की, तालुक्यातील सर्व महिला या माझ्या माता भगिनी आहेत त्यांच्या प्रगतीसाठी २०१७ पासून विविध क्षेत्रातील वक्ते आणून मार्गदर्शनपर मेळावे घेणे, तसेच महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्न करत असतोच पण आता महिलांसाठी उद्योगधंद्याच्या माध्यमातून मोठे काम करण्याची गरज आहे. तालुक्यामध्ये १९००० महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या बचतीमधून प्रती महिला २०० रुपये अशी महिन्याला तालुक्यातून ३८ लाख रुपये बचत जमा होते तर वार्षिक ४.५० कोटी रुपये बचत होते. त्या बचतीच्या माध्यमातून तालुक्यात एक मोठा उद्योग कोणत्याही सरकारी मदती शिवाय उभा राहू शकतो. त्यासाठी आपणाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. याचसाठी आपणाला सेवा वर्धिनीची मदत होणार आहे. सेवा वर्धिनीच्या माध्यमातून आपण जे काही उद्योग उभा करणार आहोत किंवा ज्या काही संस्था उभ्या करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करूया तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता प्रयत्न केल्यास तालुक्यातील प्रत्येक महिला हि सक्षम व स्वावलंबी उद्योजिका होईल असे त्यांनी सांगितले.
यानंतर गजेंद्र कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर परिवतर्न उद्योग सांगलीच्या संचालिका कल्याणीताई गाडगीळ यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले कि, आपण आपल्या मालाच्या मार्केटिंग साठी कमी पडत आहोत आपल्याकडे उत्तम दर्जाचा माल असतानाही आपण मार्केटिंगमूळे बाजारात कमी पडत आहोत. त्यासाठी मार्केटिंग कला सुधारणे गरजेचे आहे त्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर आपल्या महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे. मार्केटिंगमुळे उद्योग धंद्याची नवीन ओळख निर्माण होईल असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतामधून सोमदत्त पटवर्धन यांनी सांगितले कि, सचिन देशमुख यांनी महिलांच्या प्रगतीसाठी एक चांगले व्यासपीठ उभा केले आहे. ते गेली सात ते आठ वर्षापासून महिलांचे सक्षमीकरण व्हावे या साठी प्रयत्नशील आहेत. ते गेली १५ दिवसापासून आमच्याशी संपर्कात होते त्यांच्या विनंतीस मान देवून आज आम्ही या ठिकाणी आलो त्यांचे सांगोला तालुक्यातील महिला सक्षमीकरणाचे काम पाहून मी प्रभावित झालो आहे.खरे तर आजच्या महिला मेळाव्यात हळदी कुंकवाच समारंभ नाही किंवा कोणतेही साहित्य वाटप नाही तरी ही इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट आहे याचाच अर्थ सचिन देशमुख यांनी तुमच्या साठी काहीतरी केलंय आणि ते भविष्यात नक्की करतील असा तुमचा विश्वास आहे याचे कौतुक आहे आम्ही सेवावर्धिनी टिम महिलांच्या उद्योगासाठी नेहमीच पाठीशी राहील असा शब्द मी देतो तसेच या पुढील काळात महिलांनी डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून वारंवार एकत्र येवून उद्योग व्यवसायांवर चर्चा करणे हि काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शन ॲड. सचिन देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै. ॲड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.