आपुलकीच्या निवेदनाची तात्काळ दखल; मुख्याधिकाऱ्यांकडून ‘त्या’ धोकादायक विहीरीची पाहणी

सांगोला ( प्रतिनिधी )- कुंभार गल्लीतील ‘त्या’ धोकादायक विहिरीला संरक्षक जाळी बसवावी तसेच विहिरीतील गाळ काढून आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई काळात कुंभार गल्लीतील नागरिकांना या विहिरीचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आपुलकीच्या वतीने निवेदनाद्वारे केल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी तात्काळ विहिर परिसरात भेट देऊन पाहणी करून योग्य त्या उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.
कुंभार गल्लीत असलेल्या धोकादायक विहिरीत २ फेब्रुवारी रोजी अडीच वर्षाचा मुलगा पडला होता त्यास वाचवण्यात यश आले, मात्र भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून या विहिरीला संरक्षण जाळी बसवण्याची मागणी आपुलकी प्रतिष्ठानकडून सोमवारी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याची तात्काळ दखल घेत मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी आपल्या संबंधित अधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी या विहीर परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपालिका बांधकाम विभाग अभियंता आकाश करे, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड, सोहेल नाईक, सोमनाथ बनसोडे आदिसह आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, विकास देशपांडे, दिपक शिनगारे, दादा खडतरे, उमेश चांडोले, अमर कुलकर्णी, संदीप पाटणे आदी सदस्य उपस्थित होते. निवेदनाची तात्काळ दखल घेतल्याबद्दल आपुपकीच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले.