सांगोला तालुकाक्रीडामहाराष्ट्र

माझ्या आईला दिलेले वचन मी आज पूर्ण केले- आ.शहाजीबापू पाटील

सांगोला तालुका महायुतीची सांगोला येथे जाहीर सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्याने 1993 साली पाण्याचा लढा दिला. तेव्हापासून पाण्याच्या संघर्षाची सुरुवात झाली. त्यावेळी काढलेल्या मोर्चाचा आज शेवट झाला आहे. त्यामुळे आता पाणी मागण्याची गरज नाही. देशमुख घराचा मला राग, व्देष नाही, दोन्ही नातू माझ्या पोराचे वयाचे आहेत. मी आणि दिपकआबा आम्ही भांडूही तेवढे आणि मिठ्याही तेवढ्याच मारु .. पण तुमचे गबाळ आता पेनुरला घालवल्याशिवाय आम्ही दोघे राहणार नाही. 55 वर्षे तांबड फडक्याने तालुक्याचा घात केला आहे. आता तांबडे फडके पुढे आणायचे नाही आणि आपल्या पाठीत हाताने खंजीर खुपसुन घ्यायचा नाही, असे मत आ.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा या योजनांतून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्री मंडळाची मान्यता देऊन 883 कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी सांगोला तालुका महायुतीची काल शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे जाहीर सभा संपन्न झाली.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.

आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, आबासाहेब कुठेही चुकले नाहीत. व्यक्तिगत म्हणून त्यांना आज ही वंदन करतो. मात्र आबासाहेबांचा पक्ष चुकला.. पक्ष चुकतो तेव्हा कितीही बुद्धिवान माणूस असला तरी कर्तृत्व दाखवता येत नाही, असे सांगत सांगोला तालुक्यासाठी आजचा दिवस हा ऐतिहासीक दिवस आहे. आजपर्यंत रोजगार हमीची कामे आणि पाण्याचे टँकर एवढेच माहीत होते. मागेच पाणी मागितले असते तर 40 वर्षापूर्वीच आले असते. मागायचे नाही तर कुणी आणायचे अशी टीका करत माझ्या आईला दिलेले वचन मी आज पूर्ण केले आहे. कुणालाही नावे ठेवायची नाहीत, आता आपण सर्वांनी भविष्याचा वेग घेत… विकासाची वाट चालुया, असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, बाबुराव गायकवाड, रफिक नदाफ, दिग्विजय पाटील, सागर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख श्री.दादासाहेब लवटे, नवनाथ पवार, संजय देशमुख, अभिजित नलवडे, सोमेश यावलकर, अनिल खडतरे, सचिन लोखंडे, अरूण बिले, मधुकर बनसोडे, विजय शिंदे, अनिलनाना खटकाळे, दिपक खटकाळे, अतुल पवार यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, जो खरा अन्नदाता आहे त्याला पेन्शन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले. गेल्या 5 वर्षात फाटा फुटला पण कॅनॉल आटले नाहीत. जो अडला तिथे खासदार नडला असून पाण्याची गणित-वजाबाकी कशी करावी, यांचे ज्ञान मला आहे. माढा लोकसभा मतदार संघातील एकाही तालुक्याला दिलेला एक ही शब्द अपूर्ण ठेवला नाही. आज शब्दपूर्ती झाला याचा आनंद असून एम आय डी सी, मोठे प्रकल्प दुसर्‍या टर्मसाठी राखून ठेवले असल्याचेही त्यांनी शेवटी सांगत उज्ज्वल सांगोला, बागायतदार सांगोला, यशस्वी सांगोला करण्यासाठी येणार्‍या निवडणुकीत तुमचे आशीर्वाद पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दिपकआबा म्हणाले, 2019 पासून तालुक्याच्या विकासाचे पर्व सुरू झाले. विकासाला यश मिळत नव्हते. दिशा बदलत होती. 2019 निवडणुक जिंकली आणि विकासाला सुरुवात झाली. बापुमुळे चांगल्या पद्धतीचा निधी मिळाला. बापू मुंबईतून कधीच रिकाम्या हाताने परत आले नाहीत. तालुक्याच्या चारही बाजूने पाणी आले आहे. 22 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उपसा योजेनेस प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. येणार्‍या 8 दिवसात बजेट मध्ये योजनेला आर्थिक मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. तरुणाच्या रोजगारसाठी तालुक्याच्या चारही बाजूला 4 एम आय डी सी आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, सांगोला तालुक्याने ज्या क्षणांची वाट पाहिली त्या क्षणाचे आज आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत यांचा मोठा आनंद सर्वांना झाला आहे. येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खा.रणजितसिंह निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून द्यावे लागणार आहे,असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाऊसाहेब रुपनर म्हणाले, 20 वर्षापासून मंजूर असलेला प्रकल्प जिवंत ठेवून कार्यरत करण्याची कामगिरी आमदार शहाजीबापूंनी केले. आज आनदांचा दिवस आहे. जो भाग चढावर होता. त्या भागालाही पाणी देण्याचे काम आ. शहाजीबापूंनी केले. बापूंनी सतत पाठपुरावा करत रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावला असल्यामुळे पाणी नाही असे आता एकही गाव राहणार नाही. सांगोला तालुका आता विकासाच्या मार्गावर आहे. तालुक्याला चांगले दिवस आले आहेत. ते कायम राहतील. त्या बाबतीत आम्ही दक्षता आम्ही घेऊ.
यावेळी तानाजीकाका पाटील, संभाजीतात्या आलदर, विजय बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक दादा लवटे यांनी तर आभार आनंद घोंगडे यांनी मानले. यावेळी महायुती व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!