sangola

मोदींच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल- प्रल्हादसिंह पटेल

मोदींच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल- प्रल्हादसिंह पटेल

सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्याच्या राजकारणात काही नेत्यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा स्वतःच्या परिवाराचे कल्याण केले. माढा लोकसभा मतदारसंघातील ९७ टक्के लोकांना शेतीचे पाणी मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गरीब लोकांचे दुःख माहीत आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करून भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या नंबरवर आणायची आहे. जलजीवन मिशन, शौचालय, हर घर जल, पंतप्रधान आवास योजना, महिला सशक्तीकरण, उज्वला गॅस योजना राबवून मोदींनी गरीबांचे कल्याण केले आहे. कोरोना काळात मोदींनी जगातील १५० देशांना औषधे पुरवली. गेल्या ७० वर्षात कम्युनिस्ट पक्षाला कामगारांचे कल्याण करणे जमले ते मोदींनी एका वर्षात करून दाखवले. १५ दिवसानंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असून २०४७ पर्यंत भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रुपात उदयाला येईल असा विश्वास मध्यप्रदेशचे ग्रामविकास मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी व्यक्त केला.
         भारतीय जनता पार्टीच्या क्लस्टर माढा लोकसभा प्रवास अंतर्गत शुक्रवारी सांगोल्यात संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माढा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, धैर्यशील मोहिते-पाटील, राजकुमार पाटील, जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष अतुल पवार, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, संभाजी आलदर, तानाजी वाघमोडे, राजश्री नागणे, विजय बाबर, शिवाजी गायकवाड, बंडू केदार, नवनाथ पवार, हणमंत कर्चे, आदी उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र गीत सादर करून दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
       यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात चर्चेचा मतदारसंघ आहे. खासदार शरद पवार या मतदासंघातील पाण्याचा प्रश्न सोडवतील या आशेने मतदारांनी पवारांना या मतदारसंघांचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, शरद पवारांना पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. मी खासदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवून मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला. मतदारसंघातील रेल्वे, रस्ते, पाण्याचे प्रश्न सोडवले आहेत. आता प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले की, जिल्ह्यात ४४१ सुपर वॉरियर्स, २६३ शक्तिकेंद्र प्रमुख, १३१७ बूथ प्रमुख यांच्या माध्यमातून भाजपचे मजबूत संघटन आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघ भाजपचा पर्मनंट मतदारसंघ तयार झाला आहे. तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दोन वर्षात सोडविला. २०२४  च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
       माढा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक म्हणाले, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता विचाराने तयार झाला आहे. देशात १४५ क्लस्टर तयार केले आहेत. २०४७ पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी पायाभरणी सुरू आहे. २००९ साली लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून मतदान दिले पण, पदरी निराशा पडली. केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत घेवून जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. महूद ते अयोध्या असा सायकल प्रवास केलेल्या महेंद्र खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!