सांगोल्यातील सुपुत्राचा 27 वा चीन दौरा – विलास ठोंबरे यांचे उल्लेखनीय कार्य

सांगोला – मूळ सांगोल्याचे रहिवासी व सध्या कोथरूड पुणे येथे स्थायिक झालेले विलास ऊर्फ रत्नाकर ठोंबरे यांचे व्यावसायिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून या कामा साठी ते 27 व्यां वेळी चीनला रवाना झाले आहेत.
औषधनिर्माण, अन्नप्रक्रिया,आयुर्वेद उत्पादन निर्मिती या क्षेत्रातील ते जाणकार,अभ्यासक म्हणून ओळखले जात असून सुप्रसिद्ध वैद्य बालाजी तांबे यांच्या परिवार बरोबर त्यांचे काम सुरू आहे.उत्पादन निर्मिती खर्च कमी करणे, मनुष्यबळ अभावी होणारी गैरसोय टाळणयासाठी आधुनिक यंत्र सामग्री व मार्गदर्शन , नवनवीन मेडिकल व अन्न प्रक्रिया उद्योग उभा करणे,त्यासाठी प्रोत्साहन,मार्गदर्शन व प्रेरणा देणे,उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे तंत्र सहाय्य उपलब्ध करून देणे यासारखी अनेक कामे त्यांनी केली असून टेक्निकल अभ्यास व मार्गदर्शन देण्यासाठी ते नेहमी परदेशी जात असतात.आता पर्यंत त्यांनी आफ्रिका,घाना,चीन, बांगलादेश या देशा प्रमाणे भारतातील अनेक उद्योगांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले आहे.सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील 1971 बॅच चे ते विद्यार्थी असून 1977 साली कराड येथे त्यांनी बी.फॉर्म.शिक्षण पूर्ण केले आहे.वीस वर्षे चाकण येथे ग्राईप वॉटर कंपनीत प्रमुख म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र कन्सल्टिंग व्यवसाय सुरू केला. अतिशय कष्ट,जिद्द,चिकाटी व कामात झोकून देण्याची वृत्ती यामुळे ते यशस्वी ठरले आहेत.
चीन दौरा व त्या दरम्यान होणारी खाण्यापिण्याची आबाळ ओळखून त्यांनी इन्स्टंट पावभाजी,उपमा,सांबर निर्मितीचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.या व्यवसायात त्यांनां त्यांची मुलगी प्रार्थना ठोंबरे – करवंदे ही मदत करत आहे.वयाच्या सत्तरीत देखील त्यांचे काम उत्साहात सुरू असून मराठी युवकांनी नोकरीच्या मागे न जाता समाजाला उपयुक्त असणारे छोटेमोठे व्यवसाय सुरू करावेत,असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.