डॉ.भाई गणपतराव देशमुख सूत गिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- डॉ.भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित, सांगोले, जिल्हा सोलापूर या संस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि.26/09/2023 रोजी दुपारी 1.00 वाजता संस्थेच्या कामगार भवनमध्ये चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेच्या सुरुवातीला स्व.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस श्रीमती रतनताई देशमुख यांचे हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. तदनंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड्.नितीन गव्हाणे यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले.
डॉ.प्रभाकर माळी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला. सहकारी सूत गिरण्या उभारणीचे राज्य शासनाचे धोरण व वाटचाल याची सभेत माहिती देवून मागील 6-7 वर्षापासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेली अनिश्चितता, राज्य व केंद्र सरकारचे वस्त्रोद्योगा बाबतचे धोरण, सध्याची या उद्योगाची परिस्थिती याची माहिती सभेत दिली.
सहकारी सूत गिरण्या चालल्या पाहिजेत ही भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतल्या शिवाय तसेच सहकारी सूत गिरण्यांना आर्थिक मदत केल्या शिवाय हा उद्योग यापुढील काळात तग धरू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपली सूत गिरणीसुध्दा अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीचा सामना करीत असल्याचे सांगून ते म्हणाले अहवाल सालात संस्थेला रूपये 486.22 लाख रोखड तोटा झाला आहे. गत अहवाल सालात कापूस हंगाम 2021-2022 मध्ये खराब हवामान, अतिवृष्टी या कारणामुळे कापसाचे उत्पादन 30% ते 35% नी घटल्याने सन 2022-2023 मध्ये प्रतिखंडी दर रूपये 1.00 लाखाच्या पुढे गेल्याचे त्यांनी सभेत सांगितले. तसेच सन 2021-2022 च्या तुलनेत सन 2022-2023 मध्ये कापूस गाठींचे उत्पादन 29.88 लाख गाठीनी वाढले असले तरी कापसाचे भाव चढेच राहिले. त्यातुलनेत सूताला दर मिळत नसल्याने सूत गिरण्या चालवणे अतिशय जिकिरीचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिट्रा नॉर्म प्रमाणे सूताच्या किंमतीमध्ये कापसाचा खर्च 57% पर्यंत होणे अपेक्षित असताना सध्या हा खर्च 70% च्या पुढे गेला आहे. त्यामुळे राज्यातील 3-4 गिरण्यांचा अपवाद वगळता एकही गिरणी नफयात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आर्थिक अडचणीमुळे राज्यातील अनेक सहकारी सूत गिरण्या खाजगी व्यापार्यांना चालविण्यास दिल्याचे सांगितले.
बाजारपेठेतील कापसाची कमतरता व वाढीव उत्पादन खर्च यामुळे आपल्या गिरणीचे कामकाज माहे जुलै 2023 पासून प्रत्येक आठवडयाला दोन दिवस बंद ठेवून तोटयावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे. बहुतांश कामगार स्थानिक असून गिरणीच्या वाटचालीत त्यांचे योगदान बहुमोल असल्याने त्यांची रोजी रोटी चालू राहीली पाहिजे या उद्देशाने आर्थिक अडचणीच्या काळातही सूत गिरणी चालू ठेवली आहे. भविष्य काळात सूत गिरणीला माफक दरात वीज मिळावी म्हणून सुरुवातीला दोन मेगावेटचा सोलार प्लँट उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
गत वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचे नाव या सूत गिरणीला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार संस्थेच्या उपविधीत दुरुस्ती करून संस्थेस डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
विषय वाचन व स्पष्टीकरण चिफ अकौंटंट आर.बी.पाटील व संस्थेचे अंतर्गत लेखा परिक्षक श्री.के.एस.माळी यांनी केले. सभेचे सूत्र संचलन लेबर ऑफिसर विजय वाघमोडे यांनी केले. त्यानंतर सभाध्यक्षांनी सभासदांना सुचना मांडण्याचे आवाहन केले. त्यास अनुसरून नवनाथ पवार, बाळासाो वाळके, शहाजी पाटील, कुमार माळी, शिवाजी शिंदे, बशीरभाई तांबोळी यांनी गिरणीच्या कामकाजाबददल, कापूस लागवड, कच्चा कापूस खरेदी, जिनिंग मशिनरी विक्री, इत्यादी बाबत सुचना मांडल्या. सभासदांनी उपस्थित केलेल्या सुचनांवर संस्थेचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांनी मुद्देसुद स्पष्टीकरण केले.
संस्थेचे माजी चेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे यांनी सांगितले की, वस्त्रोद्योग व्यवसायात दर 5-6 नंतर मंदीची लाट येत असते, याबाबत पूर्वीचाही अनुभव संस्थेस आहे. त्यामुळे सद्या संस्थेस तोटा होत असला तरी भविष्यात या परिस्थितीत निश्चित बदल होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. सभासदांनी संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून भविष्यात गिरणीचे कामकाज केले जाईल व त्यासाठी सर्व सभासद बंधू-भगिनींनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन तथा सभाध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी यांनी केले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, माजी तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव-पाटील, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरूण पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, किशोर बनसोेडे, माजी जि.प. सदस्य अॅड्.सचिन देशमुख, संगम धांडोरे, माजी उपसभापती लक्ष्मण माळी, गोविंद माळी, भारत माळी, सूत गिरणीचे माजी संचालक शहाजीराव नलवडे, अवधुत कुमठेकर, रामचंद्र लवटे,सुनिल चौगुले, खरेदी विक्री संघाचे संचालक अॅड्.विशालदिप बाबर, संचालिका श्रीमती उषाताई लोखंडे, महिला सूत गिरणीच्या उपाध्यक्षा कल्पनाताई शिंगाडे, सौ.प्रतिभाताई माळी, महिला सूत गिरणीच्या संचालिका सौ.उषाताई देशमुख, श्रीमती कौशल्याताई शिंदे, संजय शिंगाडे, बापू ठोकळे आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, कामगार व सभासद मोठया प्रमाणात उपस्थित होते.
संस्थेचे संचालक इंजि.मधुकर कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व सभाध्यक्षांचे परवानगीने सभा संपल्याचे जाहिर केले.