सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

माढा लोकसभा मतदार संघात शेकापचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नावाचीच चर्चा

सांगोला/प्रतिनिधी- सांगोला तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बाल्लेकिल्ला समजला जातो. कै.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांनी ५० ते ५५ वर्षाच्या राजकारणात सांगोला तालुक्याच्या बाहेर सोलापूर व सातारा जिल्ह्यात अनेक विकासाची कामे व पिण्याचे  व शेतीचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. तसेच अनेक नेते मंडळी यांच्याशी स्नेहपूर्वक व मैत्रीपूर्ण संबंध जोपासल्यामुळे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षाची नेतेमंडळी व मतदार वर्ग हा नेहमीच कै.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिला आहे. प्रत्येक वेळी शेतकरी कामगार पक्षाने घेतलेल्या भूमिकेला माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने सकारात्मक कौल दिलेला आहे. त्यामुळेच ह्या गोष्टीचा धागा पकडून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी कै.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांची उमेदवारी  माढा लोकसभेसाठी इंडिया आघाडीकडे मागितलेली आहे.
डॉ अनिकेत देशमुख हे  “सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला” ह्या नामांकित शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक असून त्यामाध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक कामे केलेली आहेत. डॉ. अनिकेत देशमुख यांनी  वैद्यकीय क्षेत्रात अनेक शस्त्रक्रिया योजनेच्या माध्यमातून करून लोकांची सेवा केलेली आहे. सांगोला तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील पाणी प्रश्न, दुधाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न  सोडवण्यासाठी त्यांनी सरकारला व प्रशासनाला निवेदन देऊन व त्याचा पाठपुरावा करून तसेच प्रसंगी आंदोलन करून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
डॉ. अनिकेत देशमुख हे २०१९ ला सांगोला विधानसभेचे  शेकापचे उमेदवार होते त्यावेळी त्यांना १ लाखाच्या आसपास मते मिळाली होती व त्यांचा अवघ्या ७६८ मताने निसटता पराभव झाला होता.   एकूण सर्व मतदारांचा विचार करता डॉ. अनिकेत देशमुख यांनाच लोकांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजप आघाडीला असणारा शेतकऱयांचा रोष, मराठा व धनगर समाज्याच्या आरक्षणाचा रोष याचा फायदा इंडिया आघाडीला मिळू शकतो. इंडिया आघाडीला डॉ अनिकेत देशमुखसारखा तरुण, तडफदार व उच्चशिक्षीत चेहरा मिळाला तर डॉ. अनिकेत देशमुख हे विक्रमी मताने निवडून येऊ शकतात. या सर्व गोष्टीचा विचार करता डॉ. भाई अनिकेत देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!