अध्यात्मिक वातावरण तयार करण्याचे काम नामसाधना मंडळ अविरतपणे करत आहे – ऍड. गजानन भाकरे

सांगोला ( प्रतिनिधी )- वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण तालुक्यात अध्यात्मिक वातावरण तयार करण्याचे काम नामसाधना मंडळ अविरतपणे करत असल्याचे प्रतिपादन ऍड. गजानन भाकरे यांनी केले.
नामसाधना मंडळाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त श्री दत्त मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील अस्पष्ट सीमा रेषा स्पष्ट करण्याचे काम नामसाधना मंडळ करत आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात, तालुक्यात व्यापक स्वरूपात अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचे काम नामसाधना मंडळांने गेले ४० वर्ष अविरतपणे केले आहे, त्यामुळे साधकांमध्ये विशेष परिवर्तन होत आहे.
यावेळी बोलताना श्रीपाद वांगीकर म्हणाले की, वर्धापन दिनानिमित्त साधकाने आपण कुठे होतो, सध्या कुठे आहोत व आपणास कुठे जायचे आहे? याचे चिंतन केले पाहिजे. आपणास मिळत असलेले संस्कार आपल्यापुरते मर्यादित न ठेवता पुढील पिढीला दिले पाहिजेत. गेली ४० वर्ष एकसंघ भावनेने चालू असलेले नामसाधना मंडळाचे कार्य अध्यात्मिक वाटचालीत खूप मोलाचे ठरलेले आहे.
वर्धापन दिनानिमित्त दत्त मंदिर येथे सामुदायिक उपासना करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. संतोष संतोष भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला नामसाधना मंडळाचे पुरुष व महिला साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.