sangolamaharashtrapolitical

माढा लोकसभा मतदारसंघातील अजूनही सस्पेन्स कायम

सांगोला (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले. परंतु माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांनी अतिशय सावधगिरीची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.माढा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा बाळदादा मोहिते-पाटील यांनी केली होती. शरद पवारांनी शुक्रवारच्या सातारा दौऱ्यात मोहिते-पाटलांबद्दल सावध भूमिका जाहीर केली. शरद पवारांनी जाहीर केलेल्या राज्यातील पाच उमेदवारांमध्ये माढ्याचा उमेदवार नसल्याने माढ्याच्या उमेदवारीचा संभ्रम पवारांनी कायम ठेवला आहे.
शरद पवारांसमोर माढ्याच्या उमेदवारीचा तिढा आहे की शांत व संयमी भूमिका घेत माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आहे? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून शरद पवार राज्यातील नऊ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यापैकी आज बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा आणि नगर या पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पवारांच्या वाट्याला येणाऱ्या माढा, सातारा, बीड व भिवंडी या चार जागांवरील उमेदवारांचा निर्णय मागे ठेवल्याचे दिसत आहे. माढा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे शरद पवार साहेबांच्या मनात होते परंतु ऐन वेळेस महादेव जानकर यांनी कोलांटी उडी मारल्यामुळे शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघाविषयी सावध भूमिका  घेऊन उमेदवाराविषयीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे
माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप या चार नावांची चर्चा आहे. सर्वात आघाडीवर धैर्यशील मोहिते-पाटील व अभय सिंह जगताप यांच्या नावांचा समावेश आहे. माढा लोकसभेसोबतच साताऱ्याच्याही उमेदवारीचा निर्णय मागे ठेवला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे साताऱ्यातील उमेदवार ठरविताना माढ्याचा फायदा, माढा व सातारा असाही संबंध लावला जाण्याची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. माढ्यातून धनगर समाजातील उमेदवार देऊन त्याचा सामाजिक समतोलाचा लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील इतर मतदार संघ व बारामती  घेतला जाण्याची शक्यता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घ्यावा? यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर व शेकापचे नेते जयंत पाटील निर्णय घेणार आहेत.माढ्याच्या बाबतीत पहिला क्लेम धैर्यशील मोहिते-पाटील यांचा आहे, त्यानंतर आमचा शेकापचा व शेकापच्यावतीने डॉ. अनिकेत देशमुख यांचा आहे. आमच्या बैठकीत असेच ठरले असल्याची माहिती शेकापचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच प्रसार माध्यमांना दिली आहे.
जयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा, सोलापूर, सातारा, बारामती येथून भाजपला घालविण्याची उघड भूमिका जाहीर केल्यानंतर भाजप मोहिते-पाटील यांच्या बाबतीत सावध झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली.या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आज अकलूजला पाठविण्यात येणार असल्याची चर्चा होती. आज दिवसभर अकलूजकरांनी मंत्री महाजन यांची वाट पाहिली. महाजन आले नाहीत. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मात्र मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा व राजकारणाचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या सर्व गोष्टी घडत असताना सर्वसामान्य जनता मात्र कोणाच्या बाजूने आहे हे कळायला आज  तरी काही मार्ग नाही. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!