शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची ग्रंथ व पर्यावरण पूरक पायी दिंडी उत्साहात संपन्न

शिवणे वार्ताहर-शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि एन.एस.एस.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथ व पर्यावरण पूरक पायी दिंडीचे आयोजन प्रशालेतर्फे करण्यात आले होते. सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोबरोबर कुंड्या आणि ग्रंथ ठेवलेले होते.
या दिंडीची सुरवात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे,पर्यवेक्षक हेमंत रायगावकर यांच्या शुभ हस्ते पांडुरंगाची आरती घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यातील विठ्ठल रुक्मिणी आणि इतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक वेशात आलेले होते.सर्वांच्या हातात भगवी पताका होत्या.मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.शिवणे गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.या प्रभातफेरी वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. ग्यानबा तुकाराम या नावाचा जयघोष सर्व मुले करत होती .
जागोजागी महिला पुरुष वर्गाकडून स्वागत करण्यात येत होते. यावेळी काशीलिंग शेळके सर (ग्रामपंचायत सदस्य ,शिवणे)यांनी सर्वाना राजगिरा लाडूचे वाटप केले.शेवटी दिंडी ग्रामपंचायत समोर आल्यावर विद्यालयातील विध्यार्थी विद्यार्थिनींनी अभंग,गौळण,भारुड सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली. अनेक मुलींनी पारंपरिक फुगडी घालत टाळ्या मिळविल्या .सर्वात शेवटी टाळकरी, वारकरीआणि तुळशी वृंदावन घेतलेल्या मुलींचे रिगंण लक्षवेधी ठरले. शेवटी आरती आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडीची सांगता झाली.
सदर कार्यक्रमात जि. प.प्राथमिक शाळा शिवणे आणि जि. प.प्राथमिक शाळा जानकर मळा(शिवणे)या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच हरिभक्त जयकीसन चव्हाण, पखवाज वादक गणेश बनसोडे यांच्यासह गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
हा दिंडी सोहळा परपाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक ,आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.