सांगोला महाविद्यालयात पदवी व पदवीधर विदयार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने बी.ए. बी.कॉम. बी.एस्सी. व एम.एस्सी.(रसायनशास्त्र) मधील पदवी व पदव्युत्तर मधील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. रणजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी भुषविले.
यावेळी शुभेच्छा समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ.रणजित देशमुख यांनी पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, सांगोला महाविद्यालयातून जी आपल्याला ज्ञानाची शिदोरी मिळाली आहे तिचा उपयोग भावी आयुष्यामध्ये होणार आहे. सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे असून भविष्यामध्ये अनेक स्पर्धात्मक बाबींना सामोरे जावे लागणार आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे शिक्षण पुरे पडेलच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः धडपड करणे आवश्यक आहे असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण विविध क्षेत्रात या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करावा व स्वतःच्या नावाबरोबरच महाविद्यालयाचे नावलौकिक निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त् केली व माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे दरवाजे सदैव खुले राहतील असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अर्जुन मासाळ यांनी केले. तसेच पाहुण्यांचा परिचय डॉ.विद्या जाधव यांनी करून दिला. याप्रसंगी 15 विद्यार्थी व विद्यार्थींनी कृतज्ञतापूर्वक मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रम आभार प्रदर्शन प्रा.वासुदेव वलेकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन कु. वैष्णवी माळी हिने केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.