चव्हाणवाडी शाळेत गुढी पाडवा-पट वाढवा उपक्रम

: “गुढी पाडवा,पट वाढवा” या अभियानातून महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त विद्यार्थ्यांची नावे शाळेत दाखल करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांचा पट टिकून राहावा,वाढावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने “गुढी पाडवा,पट वाढवा” हा उपक्रम राबविण्यात येतो.त्यानुसार महूद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी मध्ये नुकतीच पालक सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश फॉर्म भरून घेण्यात आले होते.इयत्ता पहिलीसाठी दाखल करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.दाखल केलेल्या सर्व मुलांना साखरेचा हार,चॉकलेट, गुलाब पुष्प,शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले.
नव्याने दाखल होत असणारी ही बालके शाळेत रमण्यासाठी शाळांमध्ये मनोरंजक खेळ,वैयक्तिक परिचय व ओळख,चित्रांची पुस्तके,खेळ, गाणी- गप्पा-गोष्टी यासारखे उपक्रम एप्रिल महिन्यात शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शालेय वातावरणात ही मुले रमण्यासाठी या उपक्रमांची मदत होत आहे. शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमास संजय चव्हाण,प्रवीण नागणे,सचिन केसकर,संतोष बंडगर, नवनाथ साबळे,अमोल साबळे,हनुमंत सावंत,कैलास चव्हाण,प्रकाश केसकर, चंद्रकांत साळुंखे,मालन केसकर, रत्नप्रभा जाधव,शुभांगी यादव,स्नेहल डुबुले,भाग्यश्री सुरवसे,धनश्री ढोकळे, शितल सावंत,पूजा जाधव,तानाजी खबाले,धुळा सातपुते यांच्यासह या परिसरातील पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उमेश महाजन यांनी प्रास्ताविक केले.विठ्ठल तांबवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.