लहान भावास वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या सख्या बहिणी सह लहान भावाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
सांगोला -शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या लहान भावास वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या सख्या बहिणी सह लहान भावाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास राजुरी ( कुटे वस्ती ) ता. सांगोला येथे घडली. प्रतीक्षा आबा कुटे- ११ व ओम आबा कुटे - ७ ( दोघेही रा. राजुरी कुटे वस्ती ता. सांगोला )असे मृत बहीण भावांची नावे आहेत.
याबाबत , पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी (कुटे वस्ती ) येथील आबा कुटे यांच्या राहत्या घरापासुन पाठीमागे सुमारे २०० फूट अंतरावर नारायण कुटे यांचे शेततळे आहे दरम्यान उन्हाळ्यामुळे कुटे वस्ती येथील काही मुले जवळच विहिरीत पोहत होती त्यावेळी मृत प्रतिक्षा व ओम दोघेही सदर विहिरीवरील काठावर बसून पाय हलवत होते म्हणून पोहणाऱ्या मुलांनी त्यांना पोहता येत नाही म्हणून घराकडे पाठवले होते परंतु ओमला पोहण्याचा मोह आवरला नाही तो नारायण कुटे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला खरा पण पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडू लागल्याचे बहिण प्रतीक्षा हिने पाहिले मात्र तिलाही पोहता येत नसताना प्रतीक्षाने धाडसाने शेत तळ्यात उडी घेतली खरी,मात्र तिलाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ झाले प्रतीक्षा आणि ओम दोन मुले दिसत नाहीत म्हणून मुलांची आई व आजी शेजारील मका पिकात शोध घेत असताना १ तासभर सापडले नाहीत दुपारी ४ च्या सुमारास ओमचे कपडे व सॅंडल नारायण कुटे यांच्या शेततळ्याच्या कडेवर दिसून आले आई व आजीने आरडाओरड केल्याने रामचंद्र कुटे व बाबासाहेब कुटे यांनी शेततळ्यावर धाव घेवून शेततळ्यात उतरुन दोघांना बाहेर काढले व बेशुद्ध अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघेही मृत झाल्याचे सांगितले.