मजुर पुरवितो म्हणून उस तोड वाहन चालकाची 27 लाख रुपयांची फसवणूक
सांगोला(प्रतिनिधी):-गळीत हंगामाच्या उस तोडीकरीता उसतोड मजुर पुरवितो म्हणून अंबाजोगाई जि.बीड येथील दोघांनी 27 लाख 20 हजार रुपयांची फसवणुक केली असल्याची घटना उघडकीस आली असून हिदायत शेख व अलिम फत्रु शेख ( रा. साकुड ता.अंबाजोगाई जि. बीड) यांच्यावर सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणुकीची फिर्याद नंदु गायकवाड (रा.लक्ष्मी म. दहीवडी ता.मंगळवेढा) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.05 जून 2022 पासुन दि. 17 डिसेंबर 2022 या कालावधीत हिदायत शेख आणि अलिम शेख या दोघांनी फिर्यादीस जत येथील कारखान्याच्या सन 2022-2023 या गळीत हंगामाकरीता आठ कोयती त्यामध्ये 8 पुरुष व 8 महिला उस तोडीकरीता पुरवतो. असे सांगुन फिर्यादीकडून रोखीने, खात्यावरुन अशा वेगवेगळ्या प्रकाराने 27 लाख 20 हजार रुपये घेऊन गळीत हंगामाकरीता मजुर पुरवले नाहीत. तसेच आजपावेतो त्यांना विनंती करुनदेखील त्यांनी पैसेही परत दिलेले नाहीत, म्हणून हिदायत शेख आणि अलिम शेख या दोघांनी फिर्यादीकडून उसतोड मजुर पुरविण्याच्या कामाकरीता 27 लाख 20 हजारु रुपये घेऊन मजुर न पुरविता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेको व्हरे हे करीत आहेत.