आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा .

गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 30वे मठाधिपती, मूळ गादी कोळे, तालुका सांगोला येथील वीरशैव लिंगायत पंथाचे एक फार मोठे तपस्वी व अवतारी पुरुष. कोळे व कोळे पंचक्रोशीचे दैवत. त्यांचे शिष्य व भक्त संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात या सिमालगतच्या भागात पसरलेले आहेत.
30वे मठाधिपती कोळेकर महास्वामींजींच्या समाजकार्यांचा,धर्म व देश कार्यांचा आवाका भरपूर मोठ्या प्रमाणात होता. त्यांनी भरपूर प्रवास करून शिष्यगणांना व भक्त जणांना भक्तीरसात नाहूण निघण्याचा अनुभव प्रदान केला. त्यांनी कधीच कोणत्याही समाजा बद्दल भेदभाव केला नाही. त्यांना ते ही मान्य नव्हतं. “जात” या शब्दाला त्यांच्याजवळ किंमत नव्हती. सर्वांची “मनुष्य” ही एकच जात आहे असे ते म्हणत आणि मानत. स्वामी महाराजांचे भक्तजण व शिष्यगण समाजाच्या सर्व स्तरातून सर्व जातीं धर्मांतून येतात. जातीभेद, वर्णभेद, शिवता शिवत,गंडेदोरे, या व अशा रूढी परंपरांना व अंधश्रद्धांना स्वामी महाराजांनी कधीच थारा दिला नाही. शिवभक्ती करत असताना पुरोगामी विचारांचा वारसा वसा महाराजांनी आपल्या शिष्य व भक्त जणांना घालून दिला . वर्तमान जीवन जगत असताना मनुष्याने कसं वागलं पाहिजे व कोण कोणती मूल्ये जपली पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तुमचा घर प्रपंचा समृद्ध करून शांत, सुखी व भक्तीमय होऊन आपल्याला मिळालेल्या अमूल्य अशा मानव जन्माचे सार्थक कराल या शिकवणीवर स्वामी महाराजांचा जास्त भर होता. ते नेहमी म्हणायचे, घराचा कारभार चांगला करा, म्हणजे गावाचा कारभार चांगला होईल, आणि गावाचा कारभार चांगला झाला तर देशाचा कारभार चांगला झाल्याशिवाय राहणार नाही.
आमच्या कोळे पंचक्रोशीतील सर्व समाजातील लोकांना महाराजांच्या विचारांचा आधार वाटायचं. पंचक्रोशीतील कोणत्याही समाजातील कसल्याही प्रकारचा अडचणीचा, न सुटणारा अवघड विषय असेल तर महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर कसलेही क्लिष्ट, अडचणीचे विषय आपोआपच संपून जात असत, सर्वांसाठीच स्वामी महाराजांचा “शब्द” म्हणजे प्रमाण होतं. ते असतानाच तीक्ष्ण नजर, मंद मंद हसणारे व मितभाषी होते, पण जर का एखादा “शब्द” स्वामी महाराजांच्या वाणीतून निघालच तर कित्येकांना तो तारून उरेल एवढी ताकद त्या शब्दात होती. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, माझ्या सहित पंचक्रोशीतील कित्येक लोकांच्या बाबतीला हा अनुभव आहे. स्वामी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यागी, संन्यासी राहुन कठोर तपस्या करून जगले, म्हणूनच त्यांच्या वाणीतून निघालेल्या शब्दात एवढं सामर्थ्य भरलेलं होतं. व्यसनांच्या आहारी गेलेली, घर प्रपंचात पिचलेली, गांजलेली, रागीट, तापट व सद् विचारांचा अभाव असलेली अशी कित्येक माणसं स्वामी महाराजांनी स्मितहास्य करून दिलेल्या आशीर्वादा द्वारे तारली गेली असतील याची गिनती करता येणार नाही त्याचं मोजमाप करता येणार नाही. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजहितासाठी, जनकल्याणासाठी वाहिलं. महाराजांचे हे कार्य पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
स्वामी महाराज हे पंचक्रोशीतील व आजूबाजूच्या सर्व जनतेला मायबापा समान होते. त्यांचा अवतार हा एवढ्यासाठीच होता तो म्हणजे समाजातील गोरगरीब, रंजल्या गांजल्या लोकांना सद् विचारांचा आधार देऊन नामस्मरण करून भक्ती मार्गावर आणण्यासाठी होता ते स्वतः चंदनाप्रमाणे झिजत राहिले परंतु सर्व समाजातील सर्व घटकांना सुगंध देत राहिले.
आज तुम्ही आमच्यातून निघून गेला आज पंचक्रोशीतील बाया पोरांच्या, गड्या माणसांच्या अश्रूंना पूर आलेला आहे, महाराज, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आमचा हक्काचा, मायेचा आधारवड,आमचा “मायबाप” गेल्याचे दुःख दिसून येत आहे
तुम्ही दिलेल्या शिकवणीप्रमाणेच प्रकृतीच्या नियमानुसार पंचतत्वाने बनलेले शरीर हे नाशिवंत आहे व ते एक दिवस नष्ट होणारच आहे हे त्यांना ज्ञात होतं, आपल्या पश्चात समाजाची हेळसांड होवू नये,समाजाचा अध्यात्मिक आधार तुटू नये म्हणून त्यांनी काळजी पूर्वक धाकल्या महाराजांची निवड समाज हितासाठी केलेली आहे.
गुरुदेव स्वामी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आपल्या सर्वांना त्यांनी माऊलीचं प्रेम दिले.
गुरुदेव स्वामी महाराज तुम्ही दिलेल्या शिकवणी नुसार आम्हाला त्या पथावर चालण्यासाठी, वागण्यासाठी तुमच्या विचारांची व आशीर्वादांची फार गरज भासणार आहे, तुमचे दिव्य आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहोत हीच अपेक्षा सर्व पंचक्रोशीच्या वतीने गुरु चरणी व्यक्त करतो.
आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी.
ओम नमः शिवाय
पै.हरीभाऊ सरगर (कोळे)