*श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध : मा. आम. दत्तात्रय सावंत*
सांगोला :श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर इंगवले सरांनी 31 वर्ष केलेली सेवा धन्य आहे. या शाळेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि आण्णांचे विचार रुजविण्यासाठी इंगवले सर यांना सेवानिवृत्तीनंतरही जबाबदारी द्यावी यामुळे निश्चितपणे शाळेचे नाव उज्वल होईल, दरम्यान ज्या- ज्या वेळी गरज पडेल त्या वेळी मी सोबत असेन असा विश्वास मा. आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केला.
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेचे मुख्याध्यापक मनोहर गोविंद इंगवले हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने काल शनिवारी छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशाला येथे सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंगवले सर यांचा सत्कार करताना आणि शुभेच्छा देताना मा. आमदार दत्तात्रय सावंत बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना मा. आम. दत्तात्रय सांवत म्हणाले, अनुभव छोटा आहे पण कायम आठवणीत राहणारा आहे. निवडणुकीच्या नंतर मी सांगोला दौरा केला असता या दौऱ्यामध्ये इंगवले सर व माझी भेट झाली. यावेळी त्यांनी नकळत एक विषय समोर ठेवला तो क्षण मला आजही आठवतो. यावरून स्वर्गीय रामदास भोसले गुरुजींची नजर तीक्ष्ण होती. कारण त्यांनी इंगवले सरांसारखी माणसं निवडली. गुरुजींनी धाडस केलं, संस्था सुरू केली. यामध्ये 31 वर्ष सेवा केली. तत्कालीन काळात गाव शिक्षकांच्या मागे उभा रहात होते. यामुळे शिक्षकांना मुक्त अध्यापन करता येत होतं, आज शिक्षकांच्या मागे गाव राहत नाही आणि वेगवेगळे नियम घालून आता शिक्षकांना बांधून ठेवलं आहे. यामुळे गावं पुन्हा जर शिक्षकांच्या मागे उभा राहिले तर पुन्हा शिक्षकांच्या मनातील शाळा निर्माण होईल. पालकांना पाहिजे तशी शाळा निर्माण होईल. चिमुकल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा विचार शिक्षक करीत आहेत. येथील माळरानावर नंदनवन घडवण्याचे काम या शाळेकडून केले जात आहे. यामुळे सांगोल्यातील नामांकित शाळांमध्ये या शाळेचाही क्रमांक लागतो. असे हे उद्गार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी काढले.
डॉ.शिवराज भोसले यांनी प्रास्ताविक करताना स्व. आण्णांनी श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना १९९१ साली केली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी या प्रशालेची सुरुवात केली. सुरुवातीला या प्रशालेमध्ये ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. पुढे २ जुलै १९९३ मध्ये शासनाचे अधिकृत मान्यता मिळाली. त्यानंतर आजपर्यंत प्रशालेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत गेली. त्यानंतर सन १९९९ मध्ये बलवडी कन्या प्रशाला व सन २००२ मध्ये शिरगाव विद्यालय शिरगाव या दोन शाखांची सुरुवात केली. या सर्व शाखांमधील इयत्ता दहावीची गुणवत्ता उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम चांगली राहिली आहे त्याचबरोबर स्कॉलरशिप ,एन.एम.एम.एस इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवलेले आहे. प्रशाले मधील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत. अनेकांनी खाजगी नोकरी मिळवलेल्या आहेत. शिक्षक, प्राध्यापक, एमबीबीएस डॉक्टर, आरटीओ, इंजिनियर्स असे उच्चपदस्थ आहेत असे सांगितले. आण्णांनी विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय ग्रामीण भागात व्हावी व गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे हा हेतू समोर ठेवून आमच्या संस्थेतील तिन्ही शाखेतील सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम अविरतपणे करीत आहेत असे सांगितले. इंगवले सरांच्या विषयी बोलताना डॉ.शिवराज भोसले म्हणाले की, इंगवले सरांनी फार मोठ्या काळाची सेवा या शाळेला, संस्थेला व गावाला दिलेली आहे. सरांच्या सेवा कालावधीमध्ये वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहामध्ये आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसेच प्रशालेची देखणी व उठावदार इमारत उभी करण्या पाठीमागे मोठे नियोजन व मोलाची साथ लाभली आहे. सर्व सहकारी व संस्थेला सोबत घेऊन ग्रामीण भागातील एक आदर्श असे स्व. रामदास भोसले शिक्षण संकुल नावारूपाला आणण्यामध्ये त्यांची एक कामगिरी राहिलीआहे. सरांच्या या अखंड वृतस्थ सेवेमुळे त्यांना, त्यांच्या परिवाराला, आरोग्याला, नातेवाईकांना व त्यांच्या वैयक्तिक छंद जोपासण्याला वेळ देता आला नसेल ती अमूल्य अशी वेळ आता त्यांच्याजवळ असणारा आहे. त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या भावी आयुष्यात सुख-समृद्धी लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
शून्यातून ज्ञान मंदिर उभा राहिले आहे म्हणून सर्वांना या शाळेबद्दल आपुलकी वाटते. संस्था -शिक्षक – पालक यांनी एकोप्याने उत्कृष्ट काम केलं म्हणून आज वटवृक्ष फुलले आहे. यामध्ये तत्कालीन मुख्याध्यापक मनोहर इंगवले सर यांच्या सारख्या प्रामाणिक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. यापुढे ही असेच येथील शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचे काम करावे. असे सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी माणिक भोसले यांनी सांगितले. तर सेवेतून सेवानिवृत्त होत असला तरी, इंगवले सर यांनी मार्गदर्शक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी असे विष्णूपंत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये वसंत दिघे गुरुजी, केशव मोरे, सरपंच नवनाथ येडगे, विजयदादा शिंदे, कांताराम बाबर सर, संतोष इंगवले, अनुराधा फाटे, साक्षी भोसले, अमृता मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत, मुख्याध्यापक मनोहर इंगवले यांना भावी निरोगी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सूर्योदय उद्योग समूहाचे अनिलभाऊ इंगवले, निर्मला भोसले, डॉ. स्नेहल भोसले, सरपंच स्वाती येडगे, मा. सरपंच विजयदादा शिंदे, भारत इंगवले, पोलीस पाटील भारत फाटे, विष्णुपंत पाटील, डॉ. गव्हाणे, आण्णासाहेब मदने, उत्तम पवार, गणेश कदम, मोहन सरगर, पिरसाहेब फकीर, दलीत मित्र साबळे गुरुजी, प्रभाकर कसबे, किशोर बनसोडे, परमेश्वर गेळे, मालोजी जगताप, प्रमोद डोंबे, रुक्मिणी कोडग, माधुरी राजमाने, नवनाथ शिनगारे, संजय पवार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक- शिक्षक, तसेच इंगवले सर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन सुनील लिगाडे यांनी केले.
1993 साली सेवेत आलो. शाळेला मान्यता नव्हती, परिस्थिती अनुकूल असताना, आम्ही दररोज प्रामाणिक प्रयत्न केला. शाळेवर निष्ठा ठेवली. आज त्या निष्ठेचे फळ मिळाले असं वाटतं. यामध्ये डॉ. शिवराज भोसले यांची साथ लाभली. त्यांनी मोठा विश्वास ठेवला तो विश्वास सार्थ करण्याचे काम प्रामाणिक पणे केले. गावचे सहकार्य मिळालं, संकट आली आणि निघून गेली. संकटात सक्षमपणे कसं उभा राहायचे हे आण्णा यांनी शिकवलं. यास स्वर्गीय अण्णांच्या आठवणींना उजाळा देत, स्व. आण्णा या कार्यक्रमाला हवे होते असे सांगत तत्कालीन मुख्याध्यापक मनोहर इंगवले सर यांना अश्रू अनावर झाले.