जवळे पंचक्रोशीमध्ये वटपोर्णिमा व कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा.

जवळे(प्रशांत चव्हाण)हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण महिला वर्गाकडून शुक्रवार दिनांक 21 जून रोजी जवळे गाव व पंचक्रोशीतील आगलावेवाडी,बुरंगेवाडी तरंगेवाडी,भोपसेवाडी येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
अगदी सकाळपासूनच महिला वर्गामध्ये या सणाची लगभग दिसून येत होती. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला हाच पती मिळावा म्हणून मनोभावे प्रार्थना करीत वडाच्या झाडाची पूजा केली. तसेच महिलांनी एकमेकींना दिवसभर सोशल मीडियावर वटपौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या. जवळे पंचक्रोशीमध्ये कर्नाटकी बेंदूर अर्थात कारहूणवी सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यंदा पावसाळ्याची सुरुवात मागील वर्षाच्या तुलनेत उत्तम प्रकारे झाली आहे. खरिपाच्या पेरणीची लगबग देखील चालू आहे.कारहूणवी निमित्ताने पशुपालकांनी आपल्या पशुधनाला अंघोळ घालून त्याला नवीन दोरखंड, घागरमाळा,शिंगांना गोंडे बांधून सजवले होते त्यांची मनोभावी पूजा करून पशुधनाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.
बळीराजाला वर्षभर साथ देणाऱ्या पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करून कारहुणवीचा सण मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी साजरा केला.