शेतकर्यांच्या शेतात पाणी बघणार मगच ही चळवळ थांबणार-वैभवकाका नायकवडी
सांगोला येथे 32 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न

सांगोला:- पाणी संघर्ष चळवळीच्या जोरावर ज्या योजना कागदावर नव्हत्या त्या कागदावर आल्या एवढे मोठे काम चळवळीचे आहे. पाणी संघर्ष चळवळीमुळे काही भागात पाणी फिरले तर काही योजनांची कामे झाले असून शेतकर्यांच्या शेतात पाणी बघणार मगच ही चळवळ थांबणार असल्याचे प्रतिपादन पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नायकवडी यांनी व्यक्त केले.
सांगोला येथे काल बुधवार दिनांक 26 जून रोजी रामकृष्ण लॉन्स व्हीला राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्यातील तेरा दुष्काळ ग्रस्त तालुक्यामधील आणि विशेषतः आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची 32 वी पाणी संघर्ष परिषद संपन्न झाली. व्यासपिठावर राजेंद्र देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.बाबुराव गुरव, सुभाष पाटील, चिटणीस दादाशेठ बाबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी निमंत्रक वैभवकाका नायकवडी बोलत होते.
अध्यक्षस्थानावरुन प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, 32 वर्षे चळवळ सुरू आहे. चळवळीचे फायदे बर्यापैकी झाले आहेत. पाणी शेवटच्या टोका पर्यंत आले आहे. शेवटचे टोक मंगळवेढा आहे.त्यामुळे योजनेस गती मिळाली पाहिजे. जनशक्तीचा रेटा दाखविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, स्व.नागनाथ अण्णा व आबासाहेब यांनी लोकांच्या समवेत मोर्चे व आंदोलन केल्यामुळे दुष्काळी भागातील बर्याच योजना पूर्णत्वास आल्या असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, पुरोगामी विचारामुळे या चळवळी बघायला मिळाल्या. कठीण काळ सर्वांनी पहिला असला तरी दुष्काळी भागाचा प्रश्न आज शेवटच्या टप्प्यात आला आहे.शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत ही चळवळ अखंड पणे सुरू ठेवावी लागणार आहे.
यावेळी टेंभू योजनेचे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी असे नामकरण करणेत यावे, म्हैसाळ उरमोडी या सारख्या उपसा सिंचन योजनांचे सर्व पंप कार्यान्वीत करुन दुष्काळी भागातील सर्व तलाव, के.टी.वेअर तळी भरुन घ्यावीत, टेंभूचे पाणी वाढेगावपर्यंत आलेले आहे ते पाणी धर्मगाव बंधार्यापर्यंत सोडण्याची तरतूद करावी, माण भीमा व कोरडा या नद्यांना कॅनालचा दर्जा द्यावा, सर्व योजनावर सौर उर्जेचे प्रकल्प उभे करावेत यासह 15 ठराव एकमुखाने टाळ्यांचा गजरात हात वर करुन एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी प्रा.बाबुराव गुरव, श्री.राजेंद्र देशमुख, आर.एस.चोपडे बाळासाहेब नायकवडी, प्रा.दत्ताजीराव जाधव,प्रा.दादासाहेब ढेरे, सुनील पोतदार, अॅड.सर्फराज बागवान,श्री.विश्वंभर बाबर, राजलक्ष्मी गायकवाड, श्री.अनिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाणी परिषदेस शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यावेळी 13 तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.