सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला मतदार संघाचा आढावा घेऊन चळवळीमध्ये काम करणार्या उमेदवाराच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे, अशा पध्दतीची भावना बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.सांगोल्यासाठी 7 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असताना सुध्दा स्व.आबासाहेबांच्या प्रेरणादायी कार्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण शेकापला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे निकाल काय लागणार हेे आता कुणी सांगण्याची गरज नसून वंचित बहुजन आघाडी शेकापच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिला.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यासाठी रविवार (दि.10) रोजी पाठिंबा देण्यासाठी सांगोल्यात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस डॉ.बाबासाहेब देशमुख, जिल्ह्याचे उपाध्यक्ष लालाभाई मुलाणी, तालुकाध्यक्ष विनोद उबाळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष विनोद उबाळे म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाला पाठिंब्याचा निर्णय चांगला झाला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर सोपवली आहे.शेकापला पाठिंबा देऊन न थांबता ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तन मन धनाने काम करुन डॉ.बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देवू असा विश्वास दिला.
यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, निवडणुक पार पाडताना स्वाभीमानी विचार जपला पाहिजे. आबासाहेबांनी सांगोला तालुका निष्ठावंत आहे याचा आदर्श राज्याला घालून दिला तोच विचार तीच परंपरा आपण पुढ घेऊन जाणार आहोत.आबासाहेब हयात नसताना वंचित बहुजन आघाडी ताकदीने आमच्या पाठीमागे उभी आहे. आमच्या अडचणीच्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एवढी मोठी ताकद दिली आहे.या मदतीसाठी आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू, असे सांगत वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेऊन या पुढील कारभार करु असे आवर्जुन सांगितले.