1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त चोपडी येथे होणार भव्य वृक्षारोपण
निसर्ग संवर्धनासाठी चोपडीकरांच्या वृक्षरोपण चळवळीत अनेकांचा सहभाग

सांगोला/ प्रतिनिधी: दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच. आज जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. पुढील २२-२३ दिवस हरिनामाचा गजर करत लाखो भाविक महारष्ट्राचा सगळ्यात मोठा सांस्कृतीक, अध्यात्मिक सोहळा असलेल्या “वारी”मध्ये सहभागी होत आहेत. तुकोबांनी झाडांचे, प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश आपल्या अभंगातून दिला.वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।.पक्षी ही सुस्वरें आळविती ।। निसर्ग संवर्धनासाठी नाथ नगरीतील चोपडीकरांच्या वृक्षारोपण चळवळीत अनेकांचा सहभाग लागणार आहे.
चोपडीकरसुद्धा या वारीमध्ये “कृतिशील” कार्यक्रमाने सहभागी होत आहेत. यावर्षीची हि वारी “हरित वारी” म्हणून आपण साजरी करत आहोत. येत्या सोमवारी 1जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री. सिद्धनाथ मंदिर परिसरात, सर्वांचे सहकार्य व योगदानातून वृक्षारोपण करून आपण नाथनगरीला हिरवा शालू चढवणार आहोत.
विशेष म्हणजे या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी संत तुकाराम महाराज यांचे तेरावे वंशज ह. भ. प. शिवाजी मोरे महाराज थेट देहूतून येणार आहेत. ह. भ. प. शिवाजी मोरे महाराज, संत तुकाराम महाराज मंदिर देहूचे अध्यक्ष आहेत. तसेच ते विठ्ठल मंदिर ट्रस्ट पंढरपूरचे सदस्य आहेत. सध्या महाराज महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड समितीचे अध्यक्ष आहेत. वारी काळामध्ये हरिनामासोबतच संत तुकाराम महाराजांच्या संदेशावर कृतिशील कार्यक्रम व्हावेत यासाठी ह. भ. प. शिवाजी मोरे महाराज आग्रही असतात. “हरित वारी” हि त्यांचीच संकल्पना आहे.तरी सर्व चोपडीकरांना विनंती कि तुकाराम महाराजांच्या घरातील व्यक्तीच्या उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक वृक्षारोपण सोहळ्यामध्ये सर्वानी सहभागी व्हावे.
सोमवारी सकाळी 9 वाजता हातात कुदळ, खोऱ्या किंवा पाटी यापॆकी कोणतीही एक वस्तू घेऊन लहान-थोर सर्वानी या अभियानामध्ये सामील व्हावे.अभियानामध्ये ग्रामपंचायत चोपडी, बाळासाहेब देसाई विदयालय चोपडी, गावातील सर्व भजनी मंडळे, समस्त ग्रामस्थ चोपडी, श्री .सिद्धनाथ देवस्थान समिती चोपडी, तसेच मान्यवर यांचा विशेष सहभाग राहणार आहे.