‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात एक योजनादूत नेमला जाणार; योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून सोमवार सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात ४६ हजार तर सोलापूर जिल्ह्यात ८६५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
सोलापूर जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ८६५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. जिल्ह्यात एकूण १५७३ योजनदुत नेमले जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आप आपल्या गावात योजनेचे काम करण्यासाठी उपरोक्त नमूद संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

*योजना दूत निवडीचे निकष*

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

*कागदपत्रे*

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
०००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button