भाजपा सोलापूर माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार-सावंत यांची निवड

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये संघटनात्मक बदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे सांगोला विधानसभा निवडणुक प्रमुख तथा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची भाजपा सोलापूर माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून अभिनंदन केले जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार अशी चर्चा चालू होती. मात्र काही ना काही कारणास्तव निवड पुढे ढकलण्यात येत होती. त्याला आज बुधवारी मुहूर्त मिळाला. माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार शिवाचार्य महास्वामीजी, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी चेतनसिंह केदार सावंत यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची सोलापूर माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावागावात पक्षाचा विचार पोहचविण्याचे काम केले. गाव तेथे पक्ष आणि घर तेथे कार्यकर्ता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम केले आहे. सांगोला तालुक्यात भाजपचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून वरिष्ठांनी त्यांच्यावर सोलापूर माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

चेतनसिंह केदार-सावंत यांच्याकडे भाजपच्या सांगोला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यातच काही दिवसापूर्वी सांगोला विधानसभा निवडणूक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट भाजपच्या सोलापूर माढा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यपद्धतीवर तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या कार्यकर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

 

भारतीय जनता पार्टीचा विचार, प्रसार आणि प्रचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांना घेऊन जिल्हा भाजपमय करण्याचे ध्येय आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button