41 शाळा – महाविद्यालयातील 1 हजार 947 विद्यार्थ्यांना थेट शाळेवरच पास

ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता मिटली आहे. सांगोला एसटी बस स्थानकाकडून तालुक्यातील 41 शाळांना भेटी देऊन चालू वर्षी एकूण 1 हजार 947 विद्यार्थ्यांना थेट शाळेवरच पास वितरित केले आहेत. प्राप्त झालेल्या मागणी अर्जानुसार उर्वरित पास वितरित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आगार प्रमुख विकास पोफळे यांनी दिली आहे.
पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागत होते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात. या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ तासिका करण्यास मदत होणार आहे. शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. यामध्ये चालू वर्षी 599 विद्यार्थ्याना 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास वितरित केले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने’अंतर्गत 1 हजार 348 विद्यार्थिनींना मोफत एसटी पास असे एकूण 1 हजार 947 एसटी बसेस पास वितरित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी च्या तुलनेत 335 जादा पास वितरित करण्यात आले आहेत.
घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून सवलत दिली आहे. केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास दिला जातो आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने’अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जात आहे. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्राकर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास वितरित केले जात होते. परंतु आता विद्यार्थ्यांना पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. यासाठी एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून जादा एसटी बसेस सोडण्यात आले आहेत. या विशेष सवलतीचां व एसटी बसच्या प्रवासाचा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख विकास पोफळे यांनी केले आहे.