सांगोला शिक्षक संघाचे वतीने शिक्षकपाल्य व गुरुजनांचा सत्कार सोहळा संपन्न; सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय- मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील

असंख्य लहानग्या व्यक्तीमत्वांना आकार देऊन त्यांना घडवणारे प्राथमिक शिक्षक सदैव आदरास पात्र व भाग्यवान आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांच्या उल्लेखनीय कामामुळेच स्पर्धा परीक्षेमधील ठराविक शहरी भागाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे,असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांचा व तालुक्यातील गुरुजनांचा सत्कार समारंभ सांगोला येथे नुकताच झाला.या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.या कार्यक्रमांमध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र शिक्षक पाल्य,इयत्ता दहावी,बारावी, नीट परीक्षा,जीईई,सीईटी यासह इतर स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत शिक्षक पाल्य,सेवानिवृत्त शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापक,शिक्षक पतसंस्थांचे संचालक यांचा या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणारे सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी बोलताना म्हणाले की,पालक मोठ्या विश्वासाने आपली मुले शिक्षकांकडे स्वाधीन करतात.या लहान बालकांना आकार देऊन त्यांच्यावर संस्कार करण्याचे शिक्षकांचे काम खूप अवघड आहे. हे एकच काम असले तरी प्रत्येक मूल भिन्न असल्याने शिक्षकांपुढील आव्हान मोठे आहे.शिक्षक स्वतःच्या मुलापेक्षाही समोर असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यावर अधिक प्रेम करतात.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे व गुरुजनांचे कौतुक करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.पालकांनी मुला-मुलींचे मित्र व्हावे.ठराविकच अभ्यासक्रम निवडण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करू नये.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी लवकर सुरू करावी. प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करणे हेच यशाचे गमक आहे.यशस्वी झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आपल्या मधील भूतदया कमी होऊ देऊ नये, असेही पोलीस निरीक्षक कुलकर्णी म्हणाले.
या कार्यक्रमास विकास साळुंखे, तानाजी खबाले,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी, जिल्हा पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील,दीपकआबा साळुंखे-पाटील शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष कुमार बनसोडे,उपाध्यक्ष वसंत बंडगर,माजी अध्यक्ष तानाजी साळे,तालुका पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सावित्रा कस्तुरे,संचालक संजय काशीद,बाबासाहेब इंगोले, बाळासाहेब बनसोडे,विजयकुमार इंगवले,विलास डोंगरे,संजय गायकवाड,महादेव नागणे,गोविंद भोसले,माणिक मराठे,रफिक शेख, कमल खबाले,पल्लवी मेणकर, विश्वजीत देशमुख,गणेश व्हनखंडे यांचेसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केले. तर नागेश हवेली यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.